ऑनलाइऩ लोकमत
पणजी, दि. 9 - विविध वृत्तवाहिन्यांवरुन जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनी भाजपाला अनुकूल कौल दिला असून, गोव्यामधूनही भाजपासाठी चांगली बातमी आहे. गोव्यामध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील असा इंडिया टीवी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. पण स्पष्ट बहुमत भाजपाला मिळणार नसल्याने सत्तास्थापनेसाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागेल.
40 सदस्यांच्या गोवा विधानसभेमध्ये बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहेत. इंडिया टीवी सी वोटरच्या अंदाजानुसार गोव्यामध्ये भाजपाला 15 ते 21, काँग्रेसला 12 ते 18 आणि आम आदमी पक्षाला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. अन्य पक्षांना 2 ते 8 जागा मिळतील. त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये छोटया पक्षांना महत्व येणार आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना या तीन पक्षांनी आघाडी करुन निवडणूक लढवली आहे.
सध्याच्या गोवा विधानसभेत भाजपा 21, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष 3, काँग्रेस 9, गोवा विकास पार्टी 2 आणि अपक्ष 5 असे पक्षीय बलाबल आहे. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य नेते सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांचा एक गट भाषेच्या मुद्यावर बंड करुन संघातून बाहेर पडला. या गटाने गोवा सुरक्षा मंचची स्थापना करुन सत्ताधारी भाजपाला आव्हान दिले.
या पक्षामुळे भाजपाला नक्की किती फटका बसला ते निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. गोव्यामध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी 4 फेब्रुवारीला एका टप्प्यात मतदान झाले. एकूण 251 उमेदवार रिंगणात असून, विक्रमी 83 टक्के मतदान झाले आहे.
गोव्यामध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांमध्येच मुख्य लढत असते. पण यावेळी आम आदमी पक्ष सुद्धा काही जागांवर विजय मिळवू शकतो. शिवसेना कितपत प्रभाव ठरली ते निकालाच्या दिवशी कळेल. 11 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत.