Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 08:10 PM2024-06-01T20:10:34+5:302024-06-01T20:12:39+5:30
राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथं पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला.
Maharashtra Lok Sabha Exit Poll Result ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज बहुतांश संस्थांनी वर्तवला आहे. मात्र देशात भाजपसाठी सकारात्मक वातावरण या एक्झिट पोल्समधून दिसत असलं तरी महाराष्ट्रात मात्र विरोधकांच्या महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतल्याचं दिसत आहे. राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात शरद पवार हे पुतण्या अजित पवारांना चितपट करणार असल्याचा अंदाज टीव्ही ९-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
टीव्ही ९-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होईल. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामतीसह ते लढवत असलेल्या शिरूर, रायगड आणि उस्मानाबाद (धाराशिव) या चारही मतदारसंघांमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागेल. या एक्झिट पोलने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागांचा अंदाज वर्तवला असून अजित पवारांना भोपळाही फोडता येणार नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष जिंकत असलेल्या सहा जागांमध्ये बारामतीसह शिरूर, सातारा, अहमदनगर दक्षिण या मतदारसंघांचाही समावेश असू शकतो.
एबीपी न्यूज-सी व्होटरचा एक्झिट पोल काय सांगतो?
या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला १७, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला ६ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ही १ जागा कोणती असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काँग्रेस - ८, शरद पवार यांची राष्ट्रवादी - ६ आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जागांवर जिंकू शकते. तसंच एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.