जबलपूर : देशात भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात १६ तारखेला निकालानंतर वेगळेच चित्र दिसले. सर्व ‘एक्झिट पोल’ चुकीचे ठरतील असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केला आहे. सोबतच यंदाच्या निवडणुकांत पैसा आणि प्रसारमाध्यमे वरचढ ठरली, असेदेखील ते म्हणाले. देशात मोदी यांची लाट नसतानादेखील वृत्तवाहिन्या निकालाच्या अगोदर तसा दावा करीत आहेत. २००४ व २००९ प्रमाणे यंदादेखील ‘एक्झिट पोल’चे सर्व दावे चुकीचे ठरतील असे ते म्हणाले. यावेळी दिग्विजय सिंह यांनी भाजपावर व्यक्तीकेंद्रीत राजकारण करण्याचा आरोप लावला. भाजपाला संगठन कौशल्यावर गर्व होता. परंतु तोच पक्ष आता जेष्ठ नेत्यांना बाजूला सारुन व्यक्तीकेंद्रीत राजकारणाला खतपाणी घालत आहे. नरेंद्र मोदी यांनी मंचावर भगवान रामाचा फोटो लावून धर्माच्या नावाखाली मतं मागितली. परंतु असे करणे हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांच्या विरुद्ध असून जनप्रतिनिधीत्व कायद्याचे उल्लंघन आहे. आयोगाने यासंदर्भात कडक कारवाई करावी अशी मागणी सिंह यांनी केली.
‘एक्झिट पोल’ चुकीचे ठरणार
By admin | Published: May 13, 2014 4:24 AM