नाशिक : दसरा मेळाव्यात भाजपाला युती तोडण्याच्या धमक्या देण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा शिवसेनेने करणे अपेक्षित होते. दसरा मेळाव्याची परंपरा पाहिल्यास शस्त्र परजून ठाकरे सरकारवर वार करतील, असे वाटत होते; परंतु गंजलेले शस्त्र बोथट झाले असावे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका केली. दसरा मेळाव्यात शेती, सामाजिक प्रश्नावर पक्ष म्हणून सेनेने काही तरी भूमिका घेणे अपेक्षित होते, पण तसे घडले नाही. सेनेचे शस्त्र बोथट झाले असून, ते कोणत्याच उपयोगाचे नाही. पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री यांच्याशी सामना करण्याची कुवत या शस्त्रात राहिलेली नाही, अशी टीका करून विखे पुढे म्हणाले, दसरा मेळाव्यात बोलण्यापेक्षा ‘वर्षा’वर गप्पा मारण्यासाठी व चहापाणी घेण्यासाठी ठाकरे जातात, पण सरकारविरुद्ध बोलायची त्यांची हिंमत होत नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अगोदर विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारे ठाकरे नंतर ‘सामना’तून व्यंगचित्राच्या माध्यमातून खिल्ली उडवतात व महिलांची माफी मागतात, पण मराठा समाजाची माफी मागत नाही. शासनानेदेखील त्यांची मागणी धुडकावून लावली आहे असे सांगून, सेनेने अगोदर विरोधी पक्षात बसणे पसंत केले, नंतर सत्तेत गेले त्यांचा हा दुटप्पीपणा लपून राहिलेला नाही. सत्तेसाठी लाचार कोण हे साऱ्यांनाच ठावूक झाले असून, युतीतून बाहेर पडा ,असे भाजपाला सांगण्यापेक्षा सेनेनेच सत्तेतून बाहेर पडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र घडला की बिघडला, असे ठाकरे जाहीर सभेतून विचारतात. जर महाराष्ट्र बिघडला असेल तर सत्ता का उबवतात, असा सवाल करून विखे यांनी राहुल गांधी यांना दलाल म्हणणाऱ्या ठाकरेंनी कायम दलालीच केल्याची टीकाही केली. (प्रतिनिधी)
धमकी देण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा
By admin | Published: October 13, 2016 6:37 AM