लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यंदाचा नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून माघारी घेतली असल्याचे भारतीय हवामान विभागाने बुधवारी जाहीर केले. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर ही तारीख आहे. त्यापेक्षा यंदा मॉन्सूनचा मुक्काम १३ दिवस लांबला आहे.
या काळात देशभरात सरासरीच्या तुलनेत ७ टक्के अधिक पाऊस पडला आहे. मॉन्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल १०९ टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक दक्षिण भारतात १२९ टक्के पाऊस झाला आहे. तर उत्तर पश्चिम भारतात सरासरीपेक्षा १५ टक्के पाऊस कमी झाला आहे. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थानमधुन २८ सप्टेबरपासून सुरुवात झाली होती. तो मध्य प्रदेशापर्यंत माघारी आला होता. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले वते आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रातून अरबी समुद्राला मिळाले.
याकाळात तेलंगणा व महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्याने मॉन्सूनच्या परतीचा प्रवाह रोखला गेला होता. सप्टेबरनंतरही ऑक्टोबरमध्ये राज्यात पाऊस होत असतो. १ ते २८ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी ६९ मिमी पाऊस पडतो. यंदा ११९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीच्या तुलनेत तब्बल ७३ टक्के अधिक आहे. कोकणामध्ये १२४ टक्के, मध्य महाराष्ट्रात ११९ टक्के आणि मराठवाड्यात ५४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. ऑक्टोबर महिन्यातही विदर्भात सरासरीच्या तुलनेत १५ टक्के कमी पाऊस झाला आहे.
मॉन्सूनच्या माघारीबरोबरच राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. जळगाव येथे आज राज्यातील सर्वाधिक कमाल आणि सर्वात कमी किमान तापमान अनुक्रमे ३५ अंश सेल्सिअस आणि १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.पुणे शहरात ऑक्टोबरमध्ये सातत्याने पाऊस पडत होता़ १ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुणे शिवाजीनगर येथे३१२.४ मिमी पाऊस पडला. तो सरासरीपेक्षा तब्बल२३२.४ मिमीने अधिक आहे. लोहगाव येथे या काळात ३०८.३ मिमी पाऊस पडला. तो सरासरीपेक्षा २२६ मिमीने अधिक आहे. तर पाषाण येथे ३१९.३ मिमी पाऊस झालाआहे.