मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या करीत प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार केला. आधीचे काही पदाधिकारी वगळताना माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (धुळे), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), योगेश गोगावले (पुणे) आणि अशोक कांडेलकर (जळगाव) यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अलिकडेच नियुक्त करण्यात आलेले आ. मंगलप्रभात लोढा प्रदेश उपाध्यक्षपदीही होते. त्यांना उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. कामगार मंत्री डॉ. संजय कुटे हे आधी प्रदेश सरचिटणीस होते. त्यांना आता कार्यकारिणीत स्थान नसेल. याशिवाय, आर. सी. पाटील, रमेश कुथे, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडीचे संयोजक संजय केणेकर व व्यापारी आघाडीचे दिलीप कंदकुर्ते यांना वगळण्यात आले आहे. विजय चौधरी यांची अलिकडेच नंदुरबार जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रदेश ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य काही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे व वैयक्तिक कारणांमुळे त्यांना वगळण्यात आल्याचे प्रदेश भाजपने स्पष्ट केले आहे.प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भंडारी कायम असतील. सहमुख्य प्रवक्ता हे नवे पद तयार करण्यात आले असून त्यावर केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्ये यांच्याकडे माध्यमांच्या संपर्क प्रमुखपदाचीही जबाबदारी असेल. अन्य प्रवक्ते असे - मधु चव्हाण,गिरीश व्यास, गणेश हाके, शिरीष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शहा, अर्चना डेहनकर, शिवराय कुळकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर.दानवेंचे आमदारपुत्र जालनाचे जिल्हाध्यक्षभाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आणि आमदार संतोष दानवे यांची जालना जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय, पुणे शहर अध्यक्षपदी आ. माधुरी मिसाळ तर सरचिटणीसपदी गणेश बिडकर यांना संधी देण्यात आली आहे.अन्य नवे जिल्हाध्यक्ष असे - नाशिक शहर अध्यक्ष - गिरीश पालवे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष - नितीन भुतडा.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार; कुटे, लोढा आदींना वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 6:26 AM