मुंबई : चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा मेट्रोचा दुसरा टप्पा दहिसरपर्यंत नेण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग भूयारी असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत दिली. मुंबईतील वाढती लोकसंख्या व गाड्यांचा ताण रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर पडत आहे. हा भार हलका करण्यासाठी जलवाहतूक, कोस्टल रोड, वरळी-नरिमन पॉईंट सी लींक आदी प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याबाबतची लक्षवेधी भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांनी मांडली. विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे, योगेश सागर, रवींद्र वायकर, अशोक जाधव आदी सदस्यांनी यावेळी विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पासाठी ७,६६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई मेट्रो ट्रान्सपोर्ट प्रा. लि. कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. चारकोप येथील कारशेडला केंद्रीय पर्यावरण खात्याने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे मेट्रो-२चा टप्पा दहिसरपर्यंत वाढविण्याबाबत मे. राईट्स या शासकीय सल्लागार कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘मेट्रो-२’चा दहिसरपर्यंत विस्तार भुयारी
By admin | Published: June 12, 2014 4:34 AM