मुंबई – आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत २ गट निर्माण झाले. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ १५ आमदार राहिले. काही निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरेंकडेच राहणे पसंत केले. आता शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारणीचा विस्तार करत ६ जणांची नेतेपदी वर्णी लावली आहे. पक्ष संघटनेला राज्यात बळकटी मिळावी यासाठी या नियुक्त्या केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत या नव्या नेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
शिवसेना नेतेमंडळींमध्ये खालील नावांचा समावेश
मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू
या बैठकीत खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांना उपनेतेपदावरून नेतेपदावर बढती दिली. तर उपनेतेपदी विजय साळवी(कल्याण), संजय जाधव(परभणी), संजय पवार(कोल्हापूर), राजूल पटेल(मुंबई), शीतल देवरुखकर(मुंबई), शरद कोळी(सोलापूर) अस्मिता गायकवाड(सोलापूर), शुभांगी पाटील(नाशिक), जान्हवी सावंत(कोकण), छाया शिंदे(सातारा) यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचसोबत संघटकपदावर विलास वाव्हळ(मुंबई), विलास रुपवते(मुंबई), चेतन कांबळे(संभाजीनगर) यांना नेमण्यात आले आहे.
दरम्यान, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनाही शिवसेनेच्या मुख्य कार्यकारणीत सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. साईनाथ दुर्गे आणि सुप्रदा फातर्पेकर यांचीही शिवसेना सचिवपदावर निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. त्यात शिवसेना नाव आणि चिन्हावर शिंदे यांनी दावा केला. शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यात निवडणूक आयोगानेही शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या पक्षाचे नाव शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असं ठेवले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह वापरण्यास दिले आहे.