गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; आणखी १४ जणांना संधी, तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

By यदू जोशी | Published: September 11, 2023 07:31 AM2023-09-11T07:31:49+5:302023-09-11T07:33:03+5:30

Expansion of State Cabinet: राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. गणेशोत्सवापूर्वी हा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. आणखी १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात भाजपचा वाटा इतर दोघांपेक्षा मोठा असेल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. 

Expansion of State Cabinet Ahead of Ganeshotsav; Chances for 14 more, meeting of senior leaders of three parties | गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; आणखी १४ जणांना संधी, तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; आणखी १४ जणांना संधी, तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

googlenewsNext

- यदु जोशी  
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. गणेशोत्सवापूर्वी हा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. आणखी १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात भाजपचा वाटा इतर दोघांपेक्षा मोठा असेल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. 

राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ९ ऑगस्ट रोजी झाला होता. त्यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेचे ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि अन्य आठ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून २ जुलै रोजी शपथ घेतली होती. आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा तिसरा विस्तार लवकरच होणार असल्याचे म्हटले जाते. 

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राष्ट्रवादीचे दोन नेते भाजपच्या श्रेष्ठींना दिल्लीत अलीकडेच भेटले. तुम्ही तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत एकत्र बसा, मंत्रिपदांचे वाटप आणि नावे निश्चित करा आणि पुन्हा दिल्लीला या असे त्यांना भाजप श्रेष्ठींनी सांगितले. त्यानंतर मुंबईत तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक झाली, अशी खात्रीलायक माहिती आहे. दोन-तीन दिवसांत पुन्हा एक बैठक होण्याची शक्यता आहे.

संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्या आधीच मंत्र्यांच्या यादीला दिल्लीतून मंजुरी मिळविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असेल. असे मानले जाते की विस्तार करताना सर्वाधिक डोकेदुखी असेल ती मुख्यमंत्री शिंदे यांना. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार आलेले होते. त्यापैकी त्यांना वगळून केवळ नऊ जणांनाच मंत्रिपद देता आले. आता आणखी तीन किंवा जास्तीत जास्त ४ मंत्रिपदे मिळाली तर त्यात कोणाकोणाचे समाधान करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असेल. 

कुणाला किती मंत्रिपदे? 
सध्या भाजपचे १०, शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादीचे ९ कॅबिनेट मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांसह ४३ जण मंत्रिमंडळात असू शकतात. याचा अर्थ १४ मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यातील राष्ट्रवादीच्या वाट्याचे एक मंत्रिपद रिक्त आहे. 
ते राष्ट्रवादीला दिले जाईल. उर्वरित १३ पैकी भाजपला ७, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादीला ३ असे वाटप होण्याची दाट शक्यता आहे. 

काय असतील समीकरणे? 
- १०५ आमदार व १० अपक्षांचा पाठिंबा असूनही भाजपच्या वाट्याला केवळ १० मंत्रिपदे आलेली आहेत. त्यामुळे आता विस्तारात भाजपला झुकते माप दिले जाईल.
- विस्तारात चार ते पाच राज्यमंत्री असू शकतात. कॅबिनेट मंत्रिपदाची योग्यता असलेल्यांना राज्य मंत्रिपद देत असताना एकेकाला सात ते आठ खाती देऊन समाधान करावे असा मार्गही निघू शकतो.
- सर्वच १४ जणांना कॅबिनेट मंत्री केले तर त्यांना देण्यासाठी महत्त्वाची खाती शिल्लक नाहीत. त्याऐवजी काहींना राज्यमंत्री करून अधिक खाती दिली जाऊ शकतात. 
- अजित पवार गटाकडून सध्या शरद पवार गटात असलेल्या एका नेत्याला मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते अशी जोरदार चर्चा आहे. 

आमच्या प्रत्येक मंत्र्यास पालकमंत्रिपद मिळेल
गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल. जिल्हानिहाय पालकमंत्र्यांचीही नियुक्ती केली जाईल. आमच्या प्रत्येक मंत्र्यास पालकमंत्रिपद मिळेल. महायुती सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो तेव्हाच पालकमंत्रिपदांचे ठरले होते. 
  -सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

Web Title: Expansion of State Cabinet Ahead of Ganeshotsav; Chances for 14 more, meeting of senior leaders of three parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.