गेल्या तब्बल 38 दिवसांपासून रखडलेला राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज पार पडला. महत्वाचे म्हणजे, आज शपथ घेतलेल्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यातच, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांनी स्वतःच यावर भाष्य करत, "प्रत्येकाला वाटते, की मी मंत्री झालो पाहिले. तेसे मलाही वाटतेना. पण याचा अर्थ असा नाही, की मी नाराज आहे. आमचा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, आपण नाराज नाही," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
सत्तेसाठी आम्ही बाहेर पडलेलो नाही -शिरसाट म्हणाले, मी कोणत्याही गोष्टीवर नाराज नाही. आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हाही आमची भूमिका हीच होती. आम्ही सत्तेत असताना उठाव केला आहे. यामुळे यात नाराजी वैगेरे नाही. सत्तेसाठी आम्ही बाहेर पडलेलो नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले चालायला हवे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही नाराज नाही. शिंदे साहेबांनीही आम्हाला सांगितले आहे, की चिंता करू नका, तुमच्या पाठीशी मी उभा आहे." शिरसाट शपथविधी समारंभापूर्वी झी २४ तासशी बोलत होते.
अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार -मंत्रीमंडळात सर्वात पहिले नाव संजय शिरसाट यांचे घेतले जात होते. मात्र, ऐनवेळी ते गाळण्यात आले. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, प्रत्येक वेळेला प्रत्येकाला वाटते, की मी मंत्री झालो पाहिले. तेसे मलाही वाटतेना. पण याचा अर्थ असा नाही, की मी नाराज आहे. आमचा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास कायम राहणार आहे. याचवेळी, अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आपण नाराज नाही, असेही शिरसाट यांनी यावेली सांगितले.