विशेष प्रतिनिधी मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाओस येथे सांगितले.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-२०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सध्या डाओसमध्ये आहेत. या दौºयाच्या पहिल्या दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अन्नसुरक्षाविषयक विभागाचे प्रमुख सीन डी क्लीन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील शेतकºयांसाठी व्हॅल्यूचेन, शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज अशा अनेक विषयांवर या वेळी व्यापक चर्चा झाली.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले, विविध तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या फोरमच्या मुंबईतील केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाधारित धोरणांची अंमलबजावणी करणे अधिक सुकर होईल. या केंद्राच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राच्या वापरावर भर देण्यात येणार आहे.क्लीन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीतून व्हॅल्यूचेनला अधिक चालना देऊन राज्यातील २५ लाख शेतकºयांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर, बँकांसोबत व्यापक भागीदारी, प्रत्यक्ष पीकपद्धतीवर आधारित अर्थपुरवठा आणि सुयोग्य विम्याच्या सुविधा या विषयांवरही चर्चा झाली. ही चर्चा अन्नसुरक्षा, शाश्वत पर्यावरण आणि आर्थिक संधीतून शाश्वत शेतीकडे अधिक चांगली वाटचाल करण्यासाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी डाओस येथील मॅग्नेटिक महाराष्ट्र सेंटरला भेट दिली. गावांना डिजिटली कनेक्ट करण्याची व्यापक योजना आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीविषयी अनेक मुद्द्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांनी या वेळी चर्चा केली.शाहरूख खानला पुरस्कार-अॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या मदत व पुनर्वसनासाठी मीर फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणारे अभिनेता शाहरूख खान यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा क्रिस्टल अॅवॉर्ड मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे या वेळी अभिनंदन केले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार, मुख्यमंत्र्यांची माहिती : शेतीसाठी आणणार नवे तंत्रज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 03:23 IST