पुणे : निष्क्रिय आघाडी सरकारच्या काळात आपले प्रश्न सुटणार नाहीत, याची जनतेला खात्री होती. त्यामुळेच मराठी समाजाने आघाडी शासनाच्या काळात मोर्चे काढले नाहीत. युती सरकारवर त्यांचा विश्वास असून, आपले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा असल्यानेच मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, असा दावा जलसंपदामंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केला.जलयुक्त शिवार योजनेची पुणे विभागाची आढावा बैठक प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधान भवन येथे झाली. यावेळी पत्रकारांनी मराठा समाजाच्या मोर्चांबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘आघाडी सरकारने पंधरा वर्षांत काहीच केले नाही. युती सरकार आल्यानंतर दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला प्रगतिपथावर नेण्याचा काम सध्या सुरूआहे. कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोपर्डीतील ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबीयांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात येणार असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली आहे. तसेच या खटल्यावर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नियंत्रणाखाली चालविला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>आघाडी सरकारने भिजत ठेवलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्मारकाच्या प्रश्नाला युती सरकारने गती दिली. इंदू मिलच्या जागेचा प्रश्न सोडवला. सरकारने केलेली ही कामे विरोधकांना पाहावत नाहीत. राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचेही प्रश्न आहेत. मुख्यमंत्री मोठ्या तडफेने सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत चर्चेची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली आहे.
युती सरकारकडूनच अपेक्षा
By admin | Published: September 20, 2016 1:34 AM