पुणे : आम्ही पक्षात सहकारी म्हणून काम करीत आहोत व आमच्यात कोणतेही वाद नाहीत़ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करताना त्याबाबत गैरसमज माध्यमांद्वारे होऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे, असे निवेदन खासदार श्रीरंग बारणे व आमदार डॉ़ नीलम गो-हे यांनी काढले आहेत. शिवसेनेच्या बैठकीत बारणे व डॉ. गो-हे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत चांगलाच राडा झाला होतो. मंत्री आणि आमदारांमध्ये जुंपल्याने प्रकरण शिवीगाळ व हातघाईवर गेले. खा. श्रीरंग बारणे यांच्याशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे उपनेत्या आ. नीलम गो-हे यांना रडू कोसळल्याचंही वृत्तही समोर आलं होतं. त्यावर अखेर नीलम गो-हेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मातोश्री’वर झालेल्या या बैठकीची माहिती बाहेर जाऊ नये, म्हणून सर्वांचे मोबाइल बंद ठेवण्यात आले होते. प्रारंभीच आमदारांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध नाराजीचा सूर लावला. आ. भरत गोगावले यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मंत्र्यांनी पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. मंत्री आमची कामे करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता.त्यावर मंत्री रामदास कदम चांगलेच भडकले. ‘आम्हाला मंत्री बनण्याची खाज नाही, जे मंत्री तुमची कामे करत नाहीत त्यांची नावे घेऊन बोला. सगळ्यांना एकाच पारड्यात का मोजता?’ असे रामदास कदम यांनी खडसावले. त्यावर ‘मला उद्धव ठाकरेंनी विचारले, तर नाव सांगेन. तुम्हाला का सांगू,’ असा प्रतिप्रश्न आ. गोगावले यांनी केल्याने दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.>नीलम गो-हेंना अश्रू अनावरउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट झाली नव्हती म्हणून आ. नीलम गो-हे पुण्याहून चितळेंचे पेढे घेऊन बैठकीला आल्या होत्या. पेढे-पुष्पगुच्छ देऊन ठाकरेंचे अभीष्टचिंतन केले. बैठकीत खा. श्रीरंग बारणे यांनी गो-हे यांच्याविरोधात ‘कॉमेन्ट’ केल्याने दोघांत शाब्दिक चकमक उडाली होती. स्वत: उद्धव यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले होते. बैठक संपल्यानंतर त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली, त्या वेळी ‘हे असले वागणे आम्ही कसे सहन करायचे?’ असे म्हणत नीलम गो-हे यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.
वादविवादाचे वृत्त निराधार, गैरसमज माध्यमांद्वारे होऊ नयेत एवढीच अपेक्षा- डॉ. नीलम गो-हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 5:33 AM