कोल्हापूर/ नवे पारगाव : दुष्काळावर मात करण्यास साहाय्यभूत ठरणारे ‘जलयुक्त शिवार अभियान’ यावर्र्षी राज्यातील ६५०० गावांमध्ये राबविले असून, यासाठी १४०० कोटींचा खर्च केल्याची माहिती रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिली.अंबप (ता. हातकणंगले) येथील अंबप विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे होते. प्रमुख उपस्थिती बेळगावच्या केएलई सोसायटीचे अध्यक्ष खासदार प्रभाकर कोरे, माजी आमदार राजीव आवळे यांची होती. पालकमंत्री पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून गावासाठी लागणारे पिण्याचे आणि शेतीचे पाणी उपलब्ध होत असल्याने या कार्यक्रमावर राज्य शासनाने सर्वार्थांनी भर दिला आहे. या कार्यक्रमातून गावाला लागणाऱ्या पाण्याचे आॅडिट, पाण्याचे स्रोत बळकटीकरण, गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब नि थेंब अडविणे, मुरविणे यासह जलसंधारणाचे अन्य उपाय हाती घेण्यात आले आहेत. राज्यात राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर काही अंशी मात करणे शक्य झाले आहे. दोन-तीन महिन्यांत नियमित दाबाने शेतीसाठी वीजपुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.ते पुढे म्हणाले, सहकारी चळवळीमुळे महाराष्ट्र आज उभा आहे. ही सहकारी चळवळ टिकली पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. मात्र सहकारातील अपप्रवृत्ती आणि चुकीच्या गोष्टींना अभय दिले जाणार नाही. राज्यात जवळपास २ लाख ३ हजार सहकारी संस्था असून, त्यामधील केवळ कागदोपत्रीच कारभार असणाऱ्या एक लाख संस्था आढळून आल्याने त्या कायदेशीर कारवाईअंती टप्प्याटप्प्याने येत्या मार्चअखेर बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. याप्रसंगी वारणा सहकारी बँकेचे चेअरमन निपुण कोरे, खासदार प्रभाकर कोरे, माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे व्हाइस चेअरमन सुरेश पाटील यांनी स्वागत केले. चेअरमन डॉ. बी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. समारंभास हातकणंगले तालुका सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉ. अण्णासाहेब चौगुले, वारणा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रताप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, उपस्थित होते.शून्य टक्के व्याज : विकास सोसायट्यांना ३९ हजार कोटींचे कर्जराज्यातील २१ हजार विकास सोसायट्यांना जिल्हा मध्यवर्र्ती बँकांच्या माध्यमातून ३९ हजार कोटींचा कर्जपुरवठा शून्य टक्के व्याजदराने करून शासनाने त्यांना बळकटी देण्याचा प्रयत्न चालविला आहे. विकास सोसायट्यांना दरवर्र्षी त्यांच्या उलाढालीवर आधारित शासनाकडून अनुदान देण्याचा शासन विचार करीत असून, यातून त्यांनी सोसायटीच्या सचिवाची नेमणूक करून कारभार करावा. विकास सोसायट्यांनी कर्ज पुरवठ्यावरच न थांबता भविष्यात नवनवे उपक्रम आणि योजना हाती घेऊन आपली उलाढाल वाढवावी, असा सल्ला पाटील यांनी यावेळी दिला.अंबप विकास सोसायटीची बिनविरोध निवडणूक, १०० टक्के कर्जवसुली, शून्य एनपीए या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘जलयुक्त’मधून १४०० कोटी खर्च
By admin | Published: January 18, 2016 1:00 AM