मोसिन शेख
मुंबई - राजकीय नेत्यांचं जीवन घडाळाच्या काट्यावर चालते. त्यामुळे आठ-आठ दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन आधीच ठरलेले असते. मात्र एखादा प्रसंग असाही येतो की, एकीकडे राजकारण आणि दुसरीकडे नातसंबंधातील जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. यामध्ये अनेक नेते गोंधळून जातात, परंतु विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी राजकारण आणि मैत्री अशा दोन्ही आघाड्यांवर लिलया मार्ग काढला. त्यामुळे 'धनूभाऊ आपको मानना पडेगा', अशीच काही चर्चा परळीत सुरू होती.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा भेटीचा आदेश धनंजय मुंडे यांना आला होता. मुंबईत भेटीची वेळही ठरली होती. त्याच दिवशी परळीत जिवलग मित्राचा सत्काराचा कार्यक्रम होता. दोन्हीपैकी एकच काम पूर्ण होणार अशी स्थिती होती. परंतु, हार मानतील ते धनंजय मुंडे कसले ? मुंडे यांनी दोन दिवस प्रवास करत पवारांचा आदेश ही पाळला आणि मित्राच्या विनंतीचा मानही राखला. याविषयीची माहिती मुंडे यांनी मित्राच्या सन्मान समारंभातच सांगितली.विरोधीपक्षनेते मुंडे शनिवारी लातूर जिल्ह्यात एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांचा फोन आला. पवार यांनी मुंडे यांना रविवारी सकाळी मुंबईत येऊन भेटण्याची सूचना केली. विशेष म्हणजे त्याच दिवशी धनंजय मुंडे यांचे जिवलग मित्र डॉ. महेंद्र लोढा यांना महाराष्ट्र शासनाचा 'आदिवासी मित्र' आणि लोकमतचा 'पॉलिटिकल आयकॉन ऑफ विदर्भ' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परळीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याचही आमंत्रण मुंडे यांना आलं होतं. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा शब्द मुंडे यांनी डॉ. लोढा यांना दिला होता.मग काय धनूभाऊंनी केलं नियोजन. लातूरमधून निघायचं आणि सकाळी मुंबईत पवारांसोबत बैठक करून पुन्हा परळीत मित्राच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थितीत राहायचे असं त्यांनी ठरवलं. मात्र मुंडे यांच्या योजनेवर काही वेळातच पाणी फिरलं. नांदेड ते मुंबई विमानाने जायचं ठरलं होतं. पण त्याच दिवशी मुंबईहून नांदेडला येणारे विमान रद्द झाले. मात्र पवारांची भेट अनिवार्य असल्यामुळे त्यांनी लातूर-औरंगाबाद प्रवास करून औरंगाबादहून विमानाने मुंबईला जायचं ठरवलं. मात्र पाऊस सुरु असल्याने तेही विमान रद्द झाल्याची माहिती मिळाली. एवढ झाल्यावर आता धनंजय मुंडेंसमोर चारचाकीने मुंबई गाठायची की परळीत मित्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची असे दुहेरी संकट होते.काहीच पर्याय समोर दिसत नसल्यानं त्यांनी रात्री १ वाजता थेट लातूरहून आपला ताफा मुंबईच्या दिशेने काढला. रात्रभर प्रवास करत लोणावळ्याजवळ त्यांचा ताफा पोहचलाच होता. पण अडचणी काही पिच्छा सोडायला तयार नव्हत्या. लोणावळ्याजवळ त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघातही झाला. अपघात छोटा होता, पण अंगरक्षक व ड्रायव्हर जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर मजल दर मजल करत मुंडे सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईत दाखल झाले. अखेर पवारांसोबत बैठक ११ वाजता संपली. त्यामुळे पक्षाध्यक्षांचा आदेश पाळल्यानंतर मित्राच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे दुसरे दिव्य समोर उभे होते. पुन्हा मुंडेंचा ताफा परळीच्या दिशेनं निघाला. घडाळाच्या काट्याकडे पाहून ताफ्यातील गाडीचा वेग वाढत होता. अखेर ८ वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे परळीच्या जवळ पोहचले होते. पण त्यांच्या आगमनाशिवाय कार्यक्रम सुरु होणार नसल्याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे ताफा थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचला. मुंडेची दुसरी मोहीम सुद्धा फत्ते झाल्याची जाणीव त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होती.
राजकरणाबरोबरच नातेसंबंधाला सुद्धा तेवढाच वेळ द्यायला पाहिजे याचं उदाहरण देत त्यांनी आपल्या सोबत घडलेला हा किस्सा त्याच कार्यक्रमात सांगितला. हे ऐकून मुंडेंचे मित्र लोढा यांचं उर भरून आलं होतं.