सांगली : रंगभूमीवरील नाटकांतून विविध विषय समाजासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयोगशील नाटककारांनी आधुनिकतेची कास तर धरली पाहिजेच, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विज्ञाननिष्ठ असावे, असे मत ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे रंगभूमी दिनानिमित्त भावे नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात डॉ. जब्बार पटेल यांना नाट्यसंमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांच्याहस्ते ‘विष्णुदास भावे पदक’ प्रदान करण्यात आले. विष्णुदास भावे गौरव पदक, सन्मानचिन्ह आणि रोख ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. पटेल म्हणाले की, रंगभूमीवर चारित्र्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती प्रत्येक नाट्यकलावंताने जपली पाहिजे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो, त्या विष्णुदास भावे यांचा जीवनपट अभ्यासला, तर त्यातून खूप काही शिकता येते. भावेंनी त्या काळात पारंपरिक शिक्षणाचा म्हणजेच शालेय अभ्यासक्रमाचा त्याग करून नाट्यकलेचा ध्यास घेतला होता. म्हणजेच पारंपरिक शिक्षणाचे टाकावूपण त्यांना त्यांच्या शालेय वयातच कळले होते.सुदैवाने भावेंना राजाश्रय मिळाल्याने त्यांच्या नाट्यकलेला बहर आला. भावेंनी नाटकाची सीमारेषा केवळ मराठी या एकाच भाषेकरिता मर्यादित न ठेवता, हिंदी नाटकापर्यंत मजल मारली होती, हे दुर्लक्षून चालणार नाही. भावेंनी कोणत्याही गोष्टीकडे डोळसपणे पाहणे श्रेयस्कर मानले होते. रंगकर्र्मींनी तीच दृष्टी बाळगून त्यानुसार वाटचाल केली पाहिजे, असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
प्रयोगशील नाटककार विज्ञाननिष्ठ असावा
By admin | Published: November 06, 2014 3:50 AM