मुंबई : भायखळा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास तांबे मंगळवारी, २६ फेब्रुवारीला पोलीस दलातून निवृत्त होत आहेत. प्रयोगशील पोलीस अधिकारी म्हणून वाहतूक विभागात ते नामांकित आहेत. भायखळा विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी त्यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन केले आहे.वाहतूक पोलीस विभागाला तांबे यांनी अनेक उपक्रम भेट दिले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून भायखळा रेल्वे स्थानकासमोरील पॅलेस जंक्शन येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. रेल्वे स्थानकामधून निघणाऱ्या प्रवाशांना रस्त्याशेजारी थोपवून ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती रश्शी देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यानंतर, मुंबईतील बऱ्याचशा रेल्वे स्थानकांबाहेर विविध वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला. घोडपदेव येथील म्हाडा संकुलबाहेर होणाऱ्या पार्किंगचा वाद चर्चेतून मिटवत, तांबे यांनी स्थानिकांची मने जिंकली होती. मेगाफोन घेऊन भायखळावासीयांना शिस्तीचे धडे शिकवण्याचा प्रयोगही त्यांनीच सुरू केला.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळा विभागातील वाहतूक पोलिसाने टॅक्सी चालकाकडून लाच नाकारल्याची माहिती एका प्रवाशाने पोलीस आयुक्तांना सोशल मीडियातून दिली होती. त्या वेळी खुद्द आयुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह तांबे यांचे कौतुक केले होते. (प्रतिनिधी)
प्रयोगशील विश्वास तांबे होणार निवृत्त!
By admin | Published: February 27, 2017 1:57 AM