ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती केलेला शिवराळ भाषेचा वापर म्हणजे अक्षम्य अनास्था व कोडगेपणाचे प्रतिक असून, या विधानाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
दानवे यांनी जालना येथे जाहीर सभेत शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्याच्या प्रकाराचा विखे पाटील यांनी तीव्र निषेध केला. शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल तर किमान अवमान तरी करू नये. मागील काही काळापासून बळीराजाचे खच्चीकरण सुरूच होते. शिवीगाळ करण्याची कसर तेवढी शिल्लक होती. ती देखील भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी भरून काढली, या शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी या विधानाचा समाचार घेतला.
एकिकडे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे सांगून नवनवीन घोषणा करीत आहेत. राज्यातील शेतकरी सुजलाम-सुफलाम करण्याचा आव आणला जात आहे. दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांच्या भावनांना ठेच लावणारी विधाने करीत आहे. या दुतोंडी भूमिकेतून शेतकऱ्यांप्रतीची अनास्था दिसून येते. शेतकऱ्यांचा घोर अवमान करणाऱ्या या विधानाबाबत मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका जाहीर केली पाहिजे. मुख्यमंत्री मौन बाळगून राहिले तर या विधानाशी ते सुद्धा सहमत असल्याचे स्पष्ट होईल, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
रावसाहेब दानवेंची जीभ घसरली
बुधवारी जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दानवे यांनी शेतक-यांबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या एका कार्यकर्त्याने, तूर खरेदीबाबत आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे, असा सवाल केला. या अनपेक्षित प्रश्नाने दानवेंचा पारा चढला. ते म्हणाले, एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले. कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, असली रडगाणी आता बंद करा, अशी मुक्ताफळे दानवे यांनी उधळली.
वक्तव्याचा विपर्यास - दानवे
दरम्यान, चौफेर टीका सुरू झाल्यानंतर दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कार्यकर्त्यांना उद्देशून आपण ते वक्तव्य केले होते. शेतकरी हितासाठीच भाजपा सरकार बांधील असून, त्या दृष्टीनेच निर्णय घेतले जात आहेत, असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.