"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 02:25 PM2024-06-18T14:25:52+5:302024-06-18T14:39:16+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाय धुण्याच्या व्हिडीओवरुन पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.
Nana Patole Video : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेचा तापलं आहे. व्हिडीओमध्ये नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने हाताने धुतल्याचे समोर आलं आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. नाना पटोलेंच्या या व्हिडीओवरुन राष्ट्रवादी कांग्रेस, भाजपसह शिंदे गटाने टीका केली आहे. मात्र आता नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. ईडीच्या कारवाईने जे अंधारात कोणाचे तरी पाय धुतात त्यांनाही दाखवा असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
सोमवारी अकोल्यातील वाडेगाव येथे मुक्कामी आलेल्या संत गजानन महाराज पालखी सोहळ्याला नाना पटोले यांनी हजेरी लावली. यावेळी पटोले यांची लाडूतुला देखील करण्यात आली. ही पालखी एका मैदानात थांबली होती आणि पावसामुळे तिथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. या चिखलातून मार्ग काढत पटोले यांनी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं. त्यानंतर गाडी बसण्यासाठी जात असताना एका कार्यकर्त्यांने त्यांचे पाय पाण्याने धुतले. कार्यकर्त्याने स्वतःच्या हाताने चोळून नाना पटोले यांचे पाय धुतल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर नाना पटोले नागपूरकडे रवाना झाले. मात्र नाना पटोलेंनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं.
त्यानंतर आता नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. "तो व्हिडीओ मी पाहिला आहे. काल मी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे कार्यक्रमासाठी होतो. तिथेच गजानन महाराजांची पालखी तिथे मुक्कामासाठी होती. ज्या मैदानात पालखी होती तिथे मी लोकांबरोबर पायी तिथे गेले. चिखल असल्याने माझे पाय खराब झाले. पाय खराब झाल्यामुळे कार्यकर्त्याने पाणी आणलं आणि तो वरुन पाणी टाकत होता आणि मी हाताने पाय धुवत होतो. माझ्याबद्दल सध्या जास्त प्रेम आहे. पण ज्यांचे पाय ईडीने माखलेले आहेत ते अंधारात कोणाचे पाय धुतात हेसुद्धा दाखवा. मी तर वारकऱ्यांमध्ये गेले होतो. वारकऱ्यांना बदनाम करण्याचे काम फडणवीस सरकारच्या वेळी झालं. हर घर नल योजनेत नळच नाहीये. त्यामुळे वरुन पाणी टाकले," असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले.
"मी शेतकरी आहे. मला चिखलाची सवय आहे. चिखल आहे म्हणून गजानन महाजारांच्या पालखीचे आशीर्वाद घेणार नाही असं नाही. मी राजा नाही. मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही मी चिखलात राहणारा माणूस आहे. ईडी आणि सीबीआयने कोणाचे किती पाय माखले आहेत आणि कोण कोणाचे पाय पकडत आहे हे माहीत आहे," असेही नाना पटोले म्हणाले.