Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केलं होतं. मात्र या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. यावर पलटवार करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरत लुटीचा चुकीचा इतिहास काँग्रेसने आतापर्यंत सांगितल्याचे म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या विधानावरु आता नवा वाद सुरु झालाय. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी माझा राजा लुटारु नव्हता, असं म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली नव्हती. काँग्रेसने आपल्याला इतकी वर्षे चुकीचा इतिहास शिकवला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. याविषयी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. इतिहासातल्या चुका सुधारल्या पाहिजेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
"ज्यांच्या सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. पण मला एका गोष्टीचे समाधान आहे की, जे खऱ्या अर्थाने एका इतिसाचे अभ्यासक आहेत त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझं एकच म्हणणं आहे की माझा राजा लुटारु नव्हता. त्याला लुटारु म्हणणं खपवून घेतलं जाणार नाही. महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही. त्यांनी कधीही लूट केलेली नाही. त्यामुळे जर इतिहासामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत. इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतून आपल्या महाराजांना पाहण्याच्या ऐवजी आपल्या इतिहासकारांनी एकत्र यावं आणि जिथे कुठे चुकीचे असेल तिथे सुधारण्याचा प्रयत्न करावा," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.