मुंबई : खासगी विकासक स्वत:च्या फायद्यासाठी विक्रोळी पार्कसाइट येथील टेकडीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करत असल्याचा आरोप एका याचिकेतून करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत मुंबई उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांना या टेकडीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.टेकडीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात येत असूनही राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. अशा प्रकारे उत्खनन केले तर भूस्खलन होण्याची भीती आहे, असे मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाने म्हटले. टेकडीचे उत्खनन सुरू ठेवले तर या भागात भूस्खलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जीव धोक्यात येतील, असे जनसेवा विकास समिती या एनजीओने जनहित याचिकेत म्हटले आहे. त्यावर सरकारी वकील गीता शास्त्री यांनी टेकडीचे उत्खनन थांबवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाला सांगितली. ‘याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तुम्ही हे काम थांबवलेत, हे काम जर बेकायदेशीर होते आणि नागरिकांसाठी धोकादायक होते, तर तुम्ही परवानगी कशी दिली? जर काही दुर्घटना घडली असती तर?’ अशा शब्दांत मुख्य न्या. चेल्लुर यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. ‘जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: संबंधित ठिकाणाचे सर्वेक्षण करावे. आतापर्यंत किती उत्खनन करण्यात आले? आणि ही जागा सुरक्षित आहे का? याचीही पाहणी करून तीन आठवड्यांत अहवाल सादर करावा,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)
विक्रोळीच्या टेकडीची पाहणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2016 5:04 AM