पुणे : सलग दुसऱ्या वर्षी देशात विक्रमी देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशातून ६० ते ७० लाख टन साखरेची निर्यात होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील साखर कारखान्यांना निर्यात कोटा दिला जाणार असून, त्यासाठी विशेष सवलत देखील देण्यात येणार असल्याची माहिती साखर महासंघाने दिली. यंदाच्या गाळप हंगामात ३३० लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामातही असेच उत्पादन झाले होते. देशातील साखरेचा वार्षिक खप अडीचशे लाख टनांच्या आसपास आहे. गतहंगाम आणि यंदाचा शिल्लकी साठाधरुन यंदा १ ऑक्टोबर २०१९ ला सुरु होणाऱ्या हंगामाच्या सुरुवातीला १४५ लाख टनांचा साठा शिल्लकी असेल. त्यामुळे ६० ते ७० लाख टन साखर देशातून निर्यात होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब निदर्शानास आणून दिली. त्याची दाखल घेवून अन्न मंत्रालयाने सह सचिवांच्या (साखर) अध्यक्षतेखाली १० जुलै रोजी बैठक आयोजित केली. तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या या बैठकीत हंगाम २०१९-२० साठीच्या साखर निर्यातीचे धोरण व निर्यात योजनेवर चर्चा झाली. लवकरच २०१९-२० साठीची साखर निर्यात योजना करण्याचा निर्णय घेतला. त्यात ६० ते ७० लाख टन कच्ची व पांढरी साखर निर्यात करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी कारखाना अथवा राज्य निहाय साखर कोटा निश्चित करण्यात येईल, निर्यात दर व स्थानिक दर यातील तफावत दूर करण्यासाठी वित्तीय मदत देण्यात येईल. तसेच बँक स्तरावर निर्माण होणारा अपुरा दुरावा आणि त्यावर वेळीच उपायोजना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येईल. --निर्यातीला वातावरण अनुकुल
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने काही आयातदार देशांना भेट दिली. यंदाच्या वर्षी जगातील दोन क्रमांकाचा व वार्षिक ४५ लाख टन साखर आयात करणाऱ्या इंडोनेशियाने भारतीय साखरेच्या आयात करात १५ टक्क्याहून ५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. भारतातून तयार होणाºया कच्च्या साखरेची खरेदी करण्याचे मान्य केली आहे. तसेच थायलंड, पाकिस्तान, ब्राझील, युरोपात साखर निर्मिती कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर दोन वर्षानंतर प्रथमच साखरेचा तुटवडा जाणवेल. भारतातून निर्यात होणाऱ्या कच्च्या व पांढऱ्या साखरेची चांगली मागणी राहील. त्यासाठी साखर कारखान्यांनी नियोजनबद्धपणे पूर्वतयारीला लागावे असे, प्रकाश नाईकनवरे म्हणाले.