- निशांत वानखेडे
नागपूर : नागपूरपासून अवघ्या १५-२० किलाेमीटरवर गाेरेवाडालगतच्या माहुरझरी गावात उत्खननातून प्राचीन मणी व इतर साहित्य माेठ्या प्रमाणात सापडत आहेत. या मण्यांचे आफ्रिका व इजिप्तमध्ये मिळणाऱ्या मण्यांशी साधर्म्य असल्याने २००० वर्षांपूर्वी हे ठिकाण मणी व साैंदर्य प्रसाधन निर्यात केंद्र असावे, असा अंदाज पुरातत्त्व अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.पुरातन वारसातज्ज्ञ व विदर्भ संशाेधन मंडळाचे अधिकारी डाॅ. शेषशयन देशमुख यांनी या प्राचीन अवशेषांबाबत माहिती दिली. माहुरझरीचे महत्त्व सर्वात आधी ब्रिटिश पुरातत्व तज्ज्ञ हंटर यांनी अधाेरेखित केले हाेते. १९३३ साली त्यांनीच माहुरझरीत सापडणाऱ्या मण्यांचे आफ्रिका व इजिप्तमध्ये मिळणाऱ्या मण्यांशी संबंध असल्याचे नमूद केले. सापडलेले मणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि जगाच्या सर्व भागात दिसतात. त्यामुळे प्राचीन काळी साैंदर्यप्रसाधनाचे हे निर्यात केंद्र असावे, असा दावा त्यांनी केला हाेता.पुरातत्त्व विभागाचे उत्खनन१९७०च्या काळात राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुरातत्त्व विभाग व राज्य पुरातत्त्व विभागाकडून इथे उत्खनन सुरू केले हाेते. तेव्हापासून मण्यांसह प्राचीन विटा, लज्जा गाैरीचे शिल्प, स्टाेन सर्कल, प्राचीन वसाहतीचे चिन्ह आणि महापाषाण संस्कृतीचे अवशेषही सापडत आहेत.
सातवाहनकालीन बांधकामाचे अवशेष-नुकतेच माहुरझरी-सावनेर रस्त्याच्या कामाच्या वेळी खाेदकाम करताना प्राचीन विटा या भागात सापडल्या. त्यांनी लगेच पुरातत्त्व विभागाला माहिती दिली. त्यामुळे विभागाने आता नव्याने उत्खनन सुरू केले आहे. - विटा, मातीचे मडके व दाेन ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचे अवशेष येथे सापडत आहेत. हे सर्व वाकाटक काळासह सातवाहन काळातील अवशेष असल्याचा विश्वास अभ्यासकांना आहे.