'हाथ से हाथ जोडो' अभियानाच्या माध्यमातून भाजपचे पाप उघड करा- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 12:38 PM2023-01-26T12:38:11+5:302023-01-26T12:40:11+5:30

Nana Patole : लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरु केलेला लढा आपण पुढे नेऊ, असे आवाहन करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Expose BJP's sins through 'Haath Se Haath Jodo' campaign - Nana Patole, Republic Day was celebrated with enthusiasm at Tilak Bhavan, Mumbai | 'हाथ से हाथ जोडो' अभियानाच्या माध्यमातून भाजपचे पाप उघड करा- नाना पटोले

'हाथ से हाथ जोडो' अभियानाच्या माध्यमातून भाजपचे पाप उघड करा- नाना पटोले

Next

मुंबई : देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी जनतेला झ़गडावे लागत आहे. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ व महान ग्रंथ 'संविधान' या देशाला दिले. पण मागील ८ वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरु केलेला लढा आपण पुढे नेऊ, असे आवाहन करत  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 'हाथ से हाथ जोडो' अभियानाच्या माध्यमातून भाजपचे पाप उघड करा, असे नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दादर येथील टिळक भवन या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी जगातील इतर देशही स्वतंत्र झाले पण ७५ वर्षात लोकशाही व्यवस्था ही फक्त भारतातच रुजली व टिकली इतर देशात ती टिकू शकली नाही. याचे मूळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात आहे. संविधानाने स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मुल्ये दिली, पण मागील ८ वर्षात केंद्रात आलेल्या भाजपा सरकारमुळे ही मुल्येच धोक्यात आली आहेत. 

इंग्रज राजवटीत ज्या पद्धतीने जनतेवर अन्याय व अत्याचार केला जात होता तशाच पद्धतीचा राज्यकारभार सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, सामान्य जनतेला जगणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी काळे कायदे रद्द करावेत म्हणून वर्षभरापेक्षा जास्त दिवस आंदोलन केले पण देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी चर्चाही केली नाही. देशात असंवेदनशील सरकार आहे, जाती धर्मात भांडणे लावून भाजपा सरकार मुलभूत प्रश्नांपासून पळ काढत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

याचबरोबर, देशातील विदारक स्थिती पाहूनच राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ३५०० किलोमीटर पदयात्रा काढली. समाजातील सर्व घटकांनी या पदयात्रेत सहभागी होत राहुलजी गांधी यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा सांगितल्या. राहुलजी गांधी यांनी सुरु केलेला हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी यांनी दिलेल्या निर्देशानुसार 'हाथ से हाथ जोडो' अभियानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचा व भाजपचे पाप उघड करा. लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढ्यात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन करत नाना पटोले यांनी प्रजास त्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, राजन भोसले, राजेश शर्मा, प्रवक्ते निझामुद्दीन राईन, भरत सिंह, भावना गवळी, सचिव झिशान अहमद, राजाराम देशमुख, श्रीरंग बरगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Expose BJP's sins through 'Haath Se Haath Jodo' campaign - Nana Patole, Republic Day was celebrated with enthusiasm at Tilak Bhavan, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.