मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १ मे १९६० रोजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य निर्मितीचा समारंभ व राज्याच्या नकाशाचे अनावरण ज्या ठिकाणी झाले,त्या राजभवनातील ऐतिहासिक जागेवर रविवारी महाराष्ट्राचा नकाशा असलेली कोनशिला ठेवण्यात आली. यावेळी नव्याने उभारलेल्या १५० फूट उंच राष्ट्रध्वजाला मानवंदना आली.याप्रसंगी, राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी एच वाघेला, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, ऊर्जा मंत्री पियुष गोयल, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सुधीर मुंनगंटीवार व रामदास कदम, महापौर स्नेहल अंबेकर, अभिनेते आमीर खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.कोनशिला ठेवल्यामुळे राजभवनातील ‘जल विहार’ या वास्तूबाहेरील ही जागा प्रथमच प्रकाशात आली आहे. राज्यपालांच्या हस्ते यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, आप्पासाहेब धर्माधिकारी, अभिनेते आमीर खान यांसह निवडक मान्यवरांचा महाराष्ट्राच्या नकाशाची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर राजभवनाच्या हिरवळीवर ‘लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
राजभवनातील ऐतिहासिक जागेवर कोनशिलेचे अनावरण
By admin | Published: May 02, 2016 12:06 AM