लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तब्बल शतकोत्तर प्रवासी सेवेत असलेल्या मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल एक्स्प्रेसला १ जून रोजी ‘१०५ वर्षे’ पूर्ण होणार आहेत. तर मुंबई-पुणे मार्गावरील ‘दख्खनची राणी’ अशी ओळख असलेल्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसलाही ८७ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेतील अधिकारी, कर्मचारी सध्या ‘एक्स्प्रेस’ जल्लोषाची तयारी करीत आहेत.१ जून १९१२ रोजी वाफेच्या इंजीनसह पंजाब मेलला सुरुवात झाली. त्या वेळी पंजाब मेल ही ‘पंजाब लिमिटेड’ अशी ओळखली जात होती. मुंबईच्या बलॉर्ड पिअर या स्थानकाहून पेशावरपर्यंत तब्बल २ हजार ४९६ किलोमीटरचे अंतर ही मेल ४७ तासांत पूर्ण करीत असे. पंजाब मेल ही प्रतिष्ठेची समजली जाणारी ट्रेन आहे. ३ प्रवासी आसने आणि ३ माल डबे अशा ६ डब्यांनी मेल चालविण्यात आली. ९६ प्रवासी आसनांसह , शौचालय, स्नानगृह आणि नोकरवर्गांसाठीदेखील स्वतंत्र जागा होती. त्या वेळेतील सर्वांत जलद ट्रेन म्हणजे पंजाब मेल एक्स्प्रेस ओळखली जात होती.सध्या पंजाबमेल मुंबई ते फिरोजपूरपर्यंत चालविण्यात येते. १९३० किलोमीटरचे अंतर ३४ तासांत ही मेल पूर्ण करते. या ट्रेनमध्ये वातानुकूलित प्रथम श्रेणीसह वातानुकूलित द्वितीय श्रेणी शयनयान, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, १ भोजनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी डब्यांसह गार्ड ब्रेकयान असे डबे आहेत.राज्याच्या मुंबई-पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारी डेक्कन क्वीनची सुरुवात १ जून १९३० रोजी झाली. अल्पावधीत या ट्रेनने मुंबई-पुणे महामार्गाची राणी (दख्खनची राणी) अशी छाप प्रवाशांच्या मनावर पाडली. या मार्गावर चालविण्यात येणारी ही पहिली ‘आरामदायी’ ट्रेन आहे. सर्व प्रथम ७ डब्यांसह चालविण्यात येणारी क्वीन आपल्या रंगसंगतीमुळे त्या वेळी चर्चेत होती. स्कारलेट मोल्डिंगसह चंदेरी व गोल्डन रेषेसह रॉयल ब्ल्यू या रंगाचा वापर या ट्रेनसाठी करण्यात आला होता. माटुंगा येथील कारखान्यात ट्रेनचे डबे तयार करण्यात आले होते. सध्या डेक्कन क्वीन १७ डब्यांसह मुंबई-पुणे सुरू आहे. यात ४ वातानुकूलित चेअरकार, १ भोजनयान, द्वितीय श्रेणीचे १० चेअरकार आणि २ द्वितीय श्रेणीचे ब्रेकयान यांचा समावेश आहे.‘डेक्कन क्वीन’ला आसएसओ मानांकनडेक्कन क्वीनमध्ये देशातील पहिल्या रोलर बेअरिंग डब्यांसह ११० व्होल्ट विद्युत यंत्रणा होती. खिडकीवरील लाल रंगाच्या पट्टीसह क्रीम, आॅक्सफोई ब्ल्यू कलरमध्ये ट्रेनचे आधुनिक रूप आहे. डेक्क्न क्वीनचे मूल्यांकन इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड आणि एक्रिडेशन सिस्टम नोव्हेंबर २००३ साली आयएसओ ९००१-२००० हे मानांकन देण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवर आज ‘एक्स्प्रेस’ जल्लोष
By admin | Published: June 01, 2017 3:51 AM