खालापूर : आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळविण्यात येत असल्याने गेले तीन दिवस प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. रविवारीही या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांबरोबरच स्थानिकांचेही हाल झाले. सोमवारी आषाढी एकादशी असल्याने पंढरपूरला जाणारी अनेक वाहनेही वाहतूक कोंडीत अडकली होती.१९ जुलै रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोन जण ठार झाल्यानंतर धोकादायक दरडींचे सर्वेक्षण करून दरडी काढण्यासाठी शुक्रवारपासून काम सुरू करण्यात आले आहे. दरड काढत असताना एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक बंद करून जुन्या मार्गाने वळविण्यात आली आहे. हा मार्ग अरुंद असल्याने गेले तीन दिवस प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. जुन्या मार्गावरून अवजड व हलकी वाहने सोडण्यात येत असल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतुकीवर नियंत्रण ठेवून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रामाणिक प्रयत्न करत असले तरीही अरुंद रस्ता व वाहनांची गर्दी यामुळे पोलीसही हतबल झाले आहेत. वाहतूक कोंडीचा फटका पर्यटक व स्थानिकांनाही बसत आहे. गेले तीन दिवस होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वच हैराण झाले आहेत.(वार्ताहर)
एक्स्प्रेस-वेवर वाहतूक कोंडी
By admin | Published: July 27, 2015 1:39 AM