नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेसनं त्यांच्या पक्षातील २ आमदारांवर मोठी कारवाई केली आहे. जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यामुळे जे काँग्रेसमध्ये नाहीत त्यांचा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही असंही पटोलेंनी स्पष्ट केले.
गेल्या अनेक दिवसांपासून जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांच्या नावांची चर्चा होती. विधान परिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. त्यात महायुतीला फायदा झाला होता. यावेळी पटोलेंनी ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांची नावे आम्हाला माहिती झाली आहे. हायकमांडकडे या नावांची यादी पोहचली असून त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असा इशारा दिला होता. त्यातच आज सकाळी जितेश अंतापूरकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जितेश अंतापूरकर हे भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.
नागपूर येथे पत्रकारांनी जितेश अंतापूरकर यांच्या बाबतीत प्रश्न विचारला असताना नाना पटोलेंनी अंतापूरकर आणि सिद्दीकींची पक्षातून हकालपट्टी झाल्याचं विधान केले तेव्हा पक्षातून या आमदारांवर कारवाई झाल्याचं उघड झालं. झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार होते. परंतु नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवेळी झिशान सिद्दीकी यांनी त्यांचे स्वागत केले, मतदारसंघात यात्रेत सहभागी झाले त्यावरून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार हे जवळपास निश्चित झालं होते.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांचं तिकीट कापले जाणार असं बोलले जात होते. त्यात जितेश अंतापूरकर, झिशान सिद्दीकी यांच्याही नावाचा समावेश होता. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला तेव्हापासून अंतापूरकर भाजपात जातील अशी चर्चा होती. त्याला आज त्यांच्या काँग्रेसमधील राजीनाम्याने दुजोरा मिळाला. तर झिशान सिद्दीकी यांनी पक्षातील नेत्यांविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीत असूनही वांद्रे पूर्व मतदारसंघावर उद्धव ठाकरेंचा डोळा होता. ठाकरेंच्या दबावामुळे काँग्रेस नेत्यांकडून मला डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यात आता काँग्रेसनं या दोन्ही आमदारांची हकालपट्टी केल्यानं ते लवकरच दुसऱ्या पक्षात अधिकृत प्रवेश करतील असं बोललं जातं.