मुंबई - राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यात इच्छुक उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहू नये यासाठी ही मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली. त्यावर निवडणूक आयोगानं सकारात्मक दखल घेत अर्ज ऑफलाईन भरण्याची मुदत २ डिसेंबर संध्याकाळी ५.३० पर्यंत वाढवली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रात म्हटलंय की, राज्यात ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. सर्व्हरच्या समस्येमुळे फार मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. अर्ज भरण्याची मुदत २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता संपणार आहे. अशा परिस्थितीत हजारो इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यापासून वंचित राहून निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष होण्यास बाधा येण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितले.
त्यामुळे आयोगाने उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास परवानगी देण्याचा आदेश आज तातडीने कार्यालयीन कामकाज सुरू होईपर्यंत द्यावा. आयोगाच्या सर्व्हरमधील समस्येमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात झालेली अडचण ध्यानात घेता अर्ज भरण्याची मुदत १ दिवसाने वाढवून ३ डिसेंबर २०२२ पर्यंत करावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रमऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ५ डिसेंबरला होणार आहे. ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. महत्वाचे म्हणजे ७७५१ ग्रा. पंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी १ हजार १६५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली होती. ४ महिन्यापूर्वी शिवसेना दोन गटांत फुटल्याने शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहेत. यामुळे याचा परिणाम राज्यातील सरकारबरोबरच पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींबरोबरच ग्रामपंचायतींमध्येही पाहायला मिळणार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"