मुंबई : नाशिक पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या उपनिरीक्षकांच्या सत्र क्रमांक ११७ च्या तुकडीतील ७५० परिवेक्षणार्थी अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी दोन महिन्यांनी वाढविण्यात आला आहे.त्यामुळे या पदांना अतिरिक्त दोन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला.
विधानसभा निवडणूक व अन्य कारणामुळे विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते, त्यामुळे त्यांना १२ महिन्याऐवजी १४ महिने नाशिक येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घ्यावी लागली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने (एमपीएससी)२०१६ च्या उपनिरीक्षक परीक्षेत उर्त्तीण झालेले ७२४ उमेदवार व सत्र क्रमांक ११४ मधील २६ अशा ७५० जणांचे नाशिक येथील अकादमीमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी २२ आॅक्टोंबर २०१८ रोजी पाठविण्यात आले होते. नियोजनानुसार त्यांचे २२ आॅक्टोंबर २०१९ रोजी प्रशिक्षण पुर्ण करावयाचे होते. मात्र त्यांना निवडणूक व अन्य विविध बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते, त्यामुळे त्यांचा दोन महिन्याचा अभ्यासक्रम पुर्ण व्हावयाचा असल्याने त्यांना आता १७ डिसेंबरपर्यत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.