मुंबई : म्हाडामार्फत मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना लॉटरीसंबंधित कागदपत्रे जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन मुदतवाढीनुसार विजेत्यांना २२ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार असल्याने विजेत्यांना दिलासा मिळाला आहे.म्हाडाने ३१ मे रोजी १ हजार ६३ घरांची लॉटरी काढली. मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना अॅक्सिस बँकेत कागदपत्रे जमा करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीनंतरही सुमारे ७५0 विजेत्यांनी अद्यापपर्यंत कागदपत्रे जमा केली आहेत. विजेत्यांना लॉटरीसंबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यानुसार २२ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे जमा करता येणार आहेत. विजेत्यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची छाननी होणार आहे. या छाननीनुसार विजेत्यांची पात्रता निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर मंडळामार्फत घर ताब्यात देण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीत कोकण मंडळाच्या काही घरांचा समावेश होता. परंतु, कोकण मंडळाकडून विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्याबाबत कळविलेले नाही. त्यामुळे कोकण मंडळाची कागदपत्रे जमा करण्याची मुदत लांबणीवर जाणार आहे.
कागदपत्र सादर करण्यास अर्जदारांना मुदतवाढ
By admin | Published: September 11, 2015 3:17 AM