नवी दिल्ली/मुंबई : पीकविमा भरण्यासाठी निर्धारित ३१ जुलैला बँकांसमोर शेतकºयांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याने लाखो शेतकरी विम्यापासून वंचित राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्याची दखल घेत राज्य सरकारने तातडीने बैठक घेऊन अर्ज स्वीकारण्यासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, मुख्य सचिव सुमित मलिक व वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीत सोमवारी रात्री प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज ५ आॅगस्टपर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारण्याचा निर्णय झाला.अर्ज जनसुविधा केंद्रात न स्वीकारता बँकेतच स्वीकारले जातील. बँकांना मुदतवाढीबाबत ई-मेलद्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय व क्षेत्रीय स्तरावर जिल्हाधिकाºयांमार्फत सूचित करण्यात येत आहे. शेतकरी बांधवानी काळजी करु नये, असे फुंडकर यांनी सांगितले.तत्पूर्वी दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या. पीकविमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली होती. त्यावर पीक विम्यास मुदतवाढ देण्याची विनंती राज्याने केली आहे. गरज पडल्यास आपण स्वत: दिल्लीत जाऊन कृषीमंत्री राधामोहन यांची भेट घेऊ, मात्र शेतकºयांना कोणत्याही स्थितीत न्याय मिळवून देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.आॅनलाईन अर्ज भरताना शेतकºयांना अडचणी येत आहेत, पुरेशा मनुष्यबळाअभावी बँकांवरही ताण येत असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राधामोहन सिंह यांनी मुदतवाढीचा चेंडू राज्याच्या कोर्टात ढकलला होता.
पीकविम्याच्या अर्जासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:34 AM