पुणे : पावसाअभावी राज्यात अनेक भागात पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत यापूर्वी विम्यासाठी ३१ जुलैची मुदत होती; परंतु राज्याच्या अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या मुदतीत पेरण्याच करता आलेल्या नाहीत. पेरण्या केल्याशिवाय पीक विमा उतरविता येत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण विचारात घेऊन कृषी विभागाने विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. त्यानुसार ही सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.३१ जुलैपूर्वी पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार नाही. जे शेतकरी १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करतील, त्यांनाच या योजनेत सहभागी होता येईल. हे विमा संरक्षणही उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय राहणार आहे. शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी तातडीने कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक कृष्णराव देशमुख यांनी केले आहे. विम्याबाबत जनजागृती मागील वर्षी राज्यात ४४ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. त्यापैकी ३४ लाख २६ हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. पीक विम्याच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना १ हजार ५९४ कोटी रुपये मिळाले. आजपर्यंतचा हा विक्रमी लाभ आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी करण्यासाठी कृषी विभागाने कृषी दिनाच्या जनजागृती सप्ताहात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले असल्याचे मुख्य सांख्यिकी अधिकारी अनिल बनसोडे यांनी सांगितले.पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यकराष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्याच्या मुदतीला (कट आॅफ डेट) केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी ७ आॅगस्ट २०१५ पर्यंत मुदत वाढ दिल्याची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.खडसे म्हणाले, राज्य शासनाने केंद्राला लेखी पत्र पाठवून विम्याचे हप्ते भरण्यासाठी किमान १५ दिवस मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, केंद्राने काल ३१ जुलै राजी पत्र पाठवून ही मुदत अर्थात कटआॅफ डेट ७ आॅगस्ट पर्यंत वाढवल्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रात स्पष्टकेले आहे की, विशेष बाब म्हणून काही अटींच्या अधिन राहून ही मुदत वाढ देण्यात आली आहे.लाभार्थी शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीच्या काळात पीक विम्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित बँकेकडे आणि संबंधित यंत्रणेकडे नेहमी प्रमाणे पाठवावेत. तसेच, त्या सोबत संबंधित प्राधिकाऱ्याने दिलेले पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्रही जोडावे असेही खडसे यांनी स्पष्ट केले.
पेरण्या लांबल्याने पीक विम्याला मुदतवाढ
By admin | Published: August 02, 2015 2:55 AM