- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै आणि आॅगस्ट महिन्यात घेण्यात येणाऱ्या पुर्नपरीक्षेसाठीआॅनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत १९ जूनपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. २० जूननंतर आवेदनपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्क आकारले जाणार असल्याचे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ५ ते १४ जूनपर्यंत आवेदनपत्रे आॅनलाईन पद्धतीने भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. १४ जूननंतर आवेदनपत्रे सादर करण्यात करणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंबशुल्क भरावे लागणार होते. पण, काही तांत्रिक अडचणी कनिष्ठ महाविद्यालयांना येत होत्या. अशा अनेक तक्रारी मंडळाकडे आल्या. तांत्रिक बिघाडामुळे आवेदनपत्रे जाहीर करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कात १९ जूनपर्यंत आवेदनपत्रे जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षेस नियमित पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधारणा योजने अंतर्गत आणि काहीच विषय घेऊन बसणाऱ्या आॅनलाईन आवेदनपत्रे जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता ५ ते १९ जूनपर्यंत आवेदनपत्रे नियमित शुल्कासह जमा करण्यात येणार आहेत. यासंदर्भात अजूनही कनिष्ठ महाविद्यालयांना काही अडचणी येत असल्यास त्यांनी त्वरित विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.