ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - केंद्र सरकारने बळीराजाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला 30 जून 2017 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. याबाबत कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री( स्वतंत्र कार्यभार) निर्मला सितारामन यांच्याकडे 29 तारखेला पत्रव्यवहार करुन कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने या योजनेस मुदतवाढ दिल्याने राज्यातील कांदा उत्पादक व निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला बाजार मिळविणे व इतर देशांना स्पर्धा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कांदा निर्यातीत वाढ होऊन आगामी काळात कांदा बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता आहे, असा विश्वास खोत यांनी व्यक्त केला. सध्या बाजारात उन्हाळ कांद्याच्या आवकेत वाढ होत असून सदरचा कांदा टिकाऊ व निर्यातक्षम असल्याने येथील निर्यातदारांना कांदा निर्यातीस वाव आहे. अशा परीस्थितीत केंद्र शासनाने सदर योजनेस दि. 30 जून,2017 पर्यंत मुदतवाढ दिल्याने कांदा भाव वाढून शेतकऱ्यांना निश्चिंत दिलासा मिळेल, असं कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.