पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झालेल्या पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिकच्या शिक्षण संचालकांकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.शाळांच्या अडवणुकीमुळे अनेक पालकांना प्रवेश घेता आला नसल्याच्या तक्रारी शिक्षण संचालक कार्यालयाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी ४ मेपर्यंतची मुदतवाढ दिली होती. मात्र या कालावधीमध्येही अनेकांना प्रवेशमिळाला नसल्याच्या तक्रारी शिक्षण संचालकांकडे करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यभरातील १० हजार शाळांमधील १ लाख १६ हजार ७७९ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी राज्यभरातून २ लाख ४४ हजार ९३३ अर्ज आले. त्यातून पहिल्या फेरीत ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.
आरटीई प्रवेश प्रक्रियेला १० मेपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:54 AM