पालघर : सुप्रीमो कंपनीच्या निकृष्ट कामामुळे निष्पापांचे गेलेले बळी आणि त्या कंपनीच्या बेकायदेशीर कामाबाबत पुरावे देऊनही अधिकाऱ्यांच्या असलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे त्या कंपनी वर कुठलीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ निलेश सांबरेंनी सोमवारपासून सुरु केलेल्या उपोषणाला सर्वस्तरामधून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या उपोषणाचा धसका घेत सुप्रीमो कंपनी कडून वाडा-मनोर रस्त्याच्या कामालाही आज सुरु वात ही करण्यात आली.या महामार्गाचे २ वर्षामध्ये म्हणजे २०११ मध्ये या भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असताना ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे कंपनीला शासनाने सहा महिन्यांची वाढ दिली. तरीही कंपनीने शासनाच्या आदेशाला जुमानले नाही.आजही या रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत असताना भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील भिवंडी-वाडा या ४२ किमी अंतरावर कवाड येथे एक तर वाडा-मनोर या २२ किमी अंतरावर वाघोटे येथे एक असे २ टोल सुरु करून वसुली सुरु केली.या निकृष्ट कामाचा फटका बसून ३ वर्षामध्ये १४१ अपघाती मृत्यू तर १३५ जणांना कायमचे अपंगत्व आले असून १५०० हून अधिक जखमी झाले आहेत.भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील नित्कृष्ट दर्जाचे, अपूर्ण काम व या मार्गावर सतत होणारे अपघात याबाबत स्थानिक संस्था, संघटना यांनी शासन व प्रशासन यांच्याकडे सुप्रीम कंपनीची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठीची आंदोलने अपयशी ठरली सोमवारी सकाळी १० वाजल्या पासूनच हजारोंच्या संख्येने लोक,अपघातग्रस्तांचे नातेवाईक,अंध-अपंग विद्यार्थी,लोकप्रतिनिधी ई. नी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. पालघर जिल्ह्यात प्रथमच असे दृश्य पहायला मिळाले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक पाठिंब्या साठी आल्याने वाहतुकीवर त्याचा थोडा परिणाम झाला.त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. (वार्ताहर)
सांबरेंच्या उपोषणाला व्यापक पाठिंबा
By admin | Published: August 23, 2016 3:15 AM