ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - पाकिस्तानी गायक गुलाम अली खान यांच्या कार्यक्रमाला विरोध करणा-या शिवसेनेने आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यालाही विरोध दर्शवला आहे. सोमवार , १२ ऑक्टोबर रोजी नेहरू सेंटर येथे कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडणार असून तो रद्द करण्याची मागणी सेनेने नेहरू तारांगणच्या अधिका-यांना पत्र लिहून केली आहे. तसे न केल्यास शिवसेना स्टाईलने कार्यक्रम उधळून लावू व होण-या सर्व नुकसानास नेहरू तारांगण व्यवस्थापन जबाबदार असेल, असेही पत्रात म्हटले आहे.
सुधींद्र कुलकर्णी यांच्या ऑब्जर्वर रिसर्च फाऊंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केला असून हा कार्यक्रम करण्यावर ते ठाम आहेत. या कार्यक्रमाला विरोध करण्याचा शिवसेनेला अधिकार आहे, मात्र त्यांनी कायदा हातात घेऊ नये, तो अधिकार त्यांना नाही. आम्हाल हा कार्यक्रम करण्याचा अधिकार असून तो पा पडणारच, असे सुधींद्र कुलकर्णींनी स्पष्ट केले आहे. भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असले तरी ते सोडवण्याची जबाबदारी सरकारची आहे. दोन देशांतील तणावपूर्ण संबंधामुळे त्या देशातील नागरिकांनी व कलाकारांनी एकमेकांच्या देशात जाऊ नये असा नियम नाही, असे सांगत या प्रकरणी आपण मुखमंत्र्यांशी बोललो असून आमच्या रक्षणाची जबाबदारी त्यांची आहे, आम्ही हा कार्यक्रम करणारच असे कुलकर्णी यांनी सांगितले.
नोव्हेंबर २००२ ते २००७ या कालावधीत परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेल्या कसुरी यांनी भारत व पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. सध्या विभागीय शांतता परिषदेचे चेअरमन म्हणून काम करत आहेत.