मुंबई : राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षणाधिकारी कार्यालये चुकीच्या पद्धतीने कलाशिक्षकांना अतिरिक्त ठरवत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. कलाशिक्षक अतिरिक्त ठरल्यास, राज्यातील बहुतेक विद्यार्थी कला विषयातील महत्त्वाची असलेली एलिमेंटरी व इंटरमीजिएट या परीक्षेला मुकण्याची भीती परिषदेने व्यक्त केली आहे. कारण या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कलाशिक्षकांवर आहे.इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांना चित्रकला विषयाचा कार्यभार (वर्कलोड) आहे. मात्र, कलाशिक्षकांनाच अतिरिक्त ठरविले जात असून, तातडीने हे प्रकार थांबवण्याची मागणी आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. मोते यांनी सांगितले की, राज्यातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, तिथे कला विषयाचा पूर्ण वेळ कार्यभार उपलब्ध आहे. मात्र, त्या शाळांमधील कलाशिक्षकांना अतिरिक्त ठरविणे चुकीची बाब आहे. कारण संबंधित कलाशिक्षक अतिरिक्त झाल्यावर इतर विषयांचे अध्यापन ते कसे करतील, याचा विचार शिक्षण विभागाने करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
वर्कलोड असूनही कलाशिक्षक अतिरिक्त
By admin | Published: October 31, 2016 5:46 AM