लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या कासारवडवलीहून दहिसरमार्गे जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचा शक्याशक्यता (फिजिबिलिटी) अहवाल तातडीने तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आतापर्यंत मुंबईवर लक्ष केंद्रित करीत होते. यापुढे एमएमआर क्षेत्रातील अन्य शहरांवर अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.सूर्या पाणी योजनेतून मीरा-भार्इंदर व वसई-विरार या शहरांना ४०३ एमएलडी पाणीपुरवठा होणार असून त्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खा. राजन विचारे, आ. नरेंद्र मेहता, प्रताप सरनाईक व रवींद्र फाटक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत एमएमआरडीएने मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष दिले. आता एमएमआर क्षेत्रातील अन्य शहरे व महापालिकांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांना मेट्रोने जोडणाऱ्या प्रकल्पाचा फिजिबिलिटी रिपोर्ट प्राप्त होताच कामाला प्रारंभ केला जाईल. भार्इंदर-नायगाव-वसई या ८७५ कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाकरिता डिसेंबरअखेर निविदा मागवू. दहिसर (प.) ते भार्इंदर (प.) यांना जोडणाऱ्या रेल्वे समांतर मार्गाच्या १६० कोटींच्या कामाकरिता वर्षअखेर निविदा मागवून कार्यादेश दिले जातील. जेसल पार्क ते घोडबंदर रस्त्याचे आणि सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन या रस्त्याचे काम डिसेंबरअखेर मार्गी लावण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.आमदार प्रताप सरनाईक भाषणात म्हणाले की, मुख्यमंत्री या प्रकल्पांना एमएमआरडीएचा निधी द्या. मीरा-भार्इंदर महापालिकेचा निधी नको. म्हणजे, मग कुठल्याही नेत्याकडे २५ लाखांची लाच द्यायला कोणी कंत्राटदार जाणार नाही. दोन दिवसांपूर्वी परिवहन सेवेच्या कंत्राटदाराला आमदार नरेंद्र मेहता यांनी लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिले. त्याचा संदर्भ देत सरनाईक यांनी मेहतांना टोला लगावला.>मुख्यमंत्र्यांची आश्वासनेघोडबंदर किल्ला दुरुस्तीला निधी देणार, दिवंगत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांच्या स्मारकाकरिता निधी, तहसील कार्यालय व पोलीस आयुक्तालय उभारणार, धोकादायक इमारतींच्या विकासाकरिता क्लस्टर योजना राबवणार
यापुढे मुंबईला नव्हे तर उपनगरांना जादा निधी - देवेंद्र फडणवीस
By admin | Published: July 11, 2017 5:45 AM