ठाणे: अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील संबंधित शाळांमध्ये हजर करून घेण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे दैनंदिन हजेरीअभावी त्यांची वेतनसमस्या गंभीर झाली असून ते आर्थिक समस्येच्या चक्र व्यूहात सापडले आहे. यावर तोडगा निघेपर्यंत या शिक्षकांसाठी गुरुवारपासून ठाणे जिल्हा परिषदेत आता हजेरी रजिस्टर ठेवले असून त्यावर त्यांना दैनंदिन स्वाक्षरी करावी लागणार आहे. कोठेही हजर करून न घेतलेल्या बहुतांशी शिक्षकांना ऐन सणासुदीच्या दिवसांत वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. संचमान्यतेस अनुसरून अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त जागा असलेल्या शाळांमध्ये हजर होण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिले. १४४ शिक्षकांपैकी आतापर्यंत ७० शिक्षकांना काही शाळांनी हजर करून घेतले. मात्र, उर्वरित शिक्षकांना आदेशात नमूद असलेली शाळा हजर करून घेत नसल्यामुळे त्यांची ससेहोलपट सुरू आहे. सध्या ते जिल्हा परिषदेत ठाण मांडून आहेत. याशिवाय, जुन्या शाळांनीदेखील त्यांच्या दप्तरी या शिक्षकांना हजर होण्याआधीच कमी (रिलिव्ह) केले आहे. (प्रतिनिधी)माध्यमिक व प्राथमिक शाळांचे सुमारे ३५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यापैकी १४४ शिक्षकांना संचमान्यतेनुसार नियुक्तीपत्रे देऊन संबंधित शाळांवर हजर होण्याचे आदेश दिले. उर्वरित शिक्षकांना शिक्षण उपसंचालकांद्वारे कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये नियुक्ती मिळणार आहे. तत्पूर्वी नियुक्ती आदेश मिळालेल्या सुमारे ५० टक्के शिक्षकांना अद्यापही हजर करून घेतले नाही. या त्रस्त शिक्षकांची येथील मंगला हायस्कूलमध्ये शिक्षणाधिकारी अशोक मिसाळ यांनी गुरुवारी बैठक घेऊन त्यांच्याकडून लेखी तक्रार अर्ज घेतले आहेत.
अतिरिक्त शिक्षकांची वेतनसमस्या गंभीर
By admin | Published: October 17, 2016 3:32 AM