पुणे/बीड/ ठाणे : भगवानगड येथील दसरा मेळाव्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर एकेरी भाषेत केलेल्या टीकेचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जानकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले, तर रासपच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या छायाचित्रावर शाई फेकण्याचा प्रकार केला़. विजयादशीच्या दिवशी भगवान गडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेमध्ये जानकर यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. पंकजा मुंडे यांना असलेल्या विरोधाच्या मागे बारामतीचाच हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. शिवाय, धनंजय मुंडे यांना चमचा म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जानकरांवर संतप्त झाले आहेत.बुधवारी ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. लायकी नसलेल्या जानकरांची मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
पुण्यात शाईफेक-पशुसंवर्धनमंत्री जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या छायाचित्रावर शाई फेकली़ ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली़ चतु:श्रृंगी पोलिसांनी उमेश कोकरे यास ताब्यात घेतले आहे. ही घटना समजताच आमदार अनिल भोसले, माजी नगरसेवक नीलेश निकम, युसुफखान, उदय महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जनवाडी पोलीस चौकीसमोर गर्दी केली़ तेव्हा रासपचे कार्यकर्ते संतोष पाटील हे तेथे उभे राहून फोनाफोनी करीत होते़ त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांच्यात वादावादी झाली़ काही जणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा पोलिसांनी त्यांना बाजूला घेतले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)