पुणे : राज्यासह संपूर्ण देशातच झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका यंदा भातपिकाला बसला आहे. याचा परिणाम दिसू लागले असून, गेल्या आठ दिवसांत आंबेमोहोर तांदळाचे दर प्रतिक्विंटलमागे तब्बल २५०० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे सध्या घाऊक बाजारपेठेत आंबेमोहोर प्रथमच ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. याबाबत पुणे भुसार विभागातील तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले, की महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये नवीन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरुवात होते. मागील डिसेंबरमध्ये आंबेमोहोरचे दर ५००० रुपये प्रतिक्विंटलने सुरुवात झाली होती. महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८०% तांदूळ हा मध्य प्रदेशमधून, तर उर्वरित २०% तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो. तांदळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सुगंधी आंबेमोहोर हा तांदूळ मध्य प्रदेशात ‘विष्णुभोग’ या नावाने प्रसिद्ध आहे. या तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये घेतले जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत आंबेमोहोरचे उत्पादन कमी करून कोलम तांदळाचे उत्पादन जास्त घेतले. कारण त्यांना या दोन्हींचे दर सर्वसाधारणपणे समानच असतात. यावर्षी सुरुवातीला लचकारी कोलम तांदळाचे दर ४२०० ते ४३०० पर्यंत मिळाले होते, तर आंबेमोहोरचे दर ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल मिळाले होते. भावात फार मोठी तफावत नसल्यामुळे, आंबेमोहोर म्हणजेच विष्णुभोग तांदळाला लागणारा जास्त उत्पादन खर्च तसेच उत्पादन मिळण्यास लागणारा अधिकचा वेळ, कारण कोलम तांदूळ अडीच महिन्यात, तर आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन येण्यास साडेतीन महिने इतका कालावधी लागतो यामुळे शेतकºयांनी आंबेमोहोरचे उत्पादन कमी केले. त्याचबरोबर आतापर्यंत युरोप व अमेरिकेत सुगंधी आंबेमोहोरची निर्यात होत होती. त्यात यंदा सौदी अरब व बांगलादेश या राष्ट्रांकडून आंबेमोहोर तांदळाला खूप मागणी मिळाली. इत्यादी कारणांमुळे ही विक्रमी दरवाढ झाली आहे. यावर्षीसुद्धा शेतकºयांनी आंबेमोहोर (विष्णुभोग) तांदळाची लागवड कोलमच्या प्रमाणात कमीच केलेली आहे. त्यामुळे आगामी वर्षातही आंबेमोहोरचे दर खूप मोठ्या प्रमाणात घटतील, असे वाटत नाही. दरम्यान यावर्षीचे ११२१ बासमती तांदळाचे दर आणि सध्याचे आंबेमोहोरचे दर हे साधारणत: मिळतेजुळते आहेत. याचाच अर्थ यावर्षी आंबेमोहोरने बासमतीच्या इतके दर गाठलेले आहेत. यावर्षीचे नवीन ११२१ बासमती तांदळाचे दर ७००० ते ७५०० रु. प्रतिक्विंटल असे आहेत. महाराष्ट्रात विशेषत: पुण्यात सुगंधी आंबेमोहोर तांदळाला खूप पसंती आहे. बऱ्याच वर्षांपासून आंबेमोहोर तांदळाचा खप वाढत चालला आहे. सध्या पुण्यात रोज १० ते १५ टन इतका आंबेमोहोर विकला जातो. म्हणजेच महिन्याला २५० ते ३०० टन या तांदळाचा खप आहे. मागील दीड-दोन महिन्यात झालेल्या मोठ्या भाववाढीमुळे आंबेमोहोर तांदळाचा खप कमी झालेला आहे, असे निरीक्षण राजेश शहा यांनी नोंदविले. ......आंबेमोहोरचा दर ८० रुपये प्रतिकिलो यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला डिसेंबरमध्ये मध्य प्रदेशात आंबेमोहोर भाताचे दर २५०० रुपये प्रतिक्विंटल होते. ते आज रोजी ४३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वधारले आहेत. तेथील लिलावात दररोज चार ते पाच हजार क्विंटल भाताची आवक होत असे. ती सध्या फक्त ३०० ते ४०० क्विंटलवर येऊन ठेपली आहे. .........नवीन आंबेमोहोर बाजारात येण्यास अजून किमान दीड महिना अवकाश आहे. तोपर्यंत ७५०० रुपये प्रतिक्विंटल इतका ऐतिहासिक विक्रमी दर टिकून राहील, या आंबेमोहोरचा दर किरकोळ बाजारात ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे.
राज्यासह संपूर्ण देशात अवकाळी पावसाचा भातपिकाला मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 12:02 PM
सध्या घाऊक बाजारपेठेत आंबेमोहोर प्रथमच ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर
ठळक मुद्देआंबेमोहोर तांदूळ : दरामध्ये क्विंटलमागे २५०० रुपयांनी वाढ सुगंधी आंबेमोहोर हा तांदूळ मध्य प्रदेशात ‘विष्णुभोग’ या नावाने प्रसिद्ध आंबेमोहोरचा दर ८० रुपये प्रतिकिलो नवीन आंबेमोहोर बाजारात येण्यास अजून किमान दीड महिना अवकाश