मुंबई : मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा परतीचा पाऊस येत्या ७२ तासांत मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यासह विदर्भात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत मात्र हवामान ढगाळ राहणार आहे.मध्य भारतासह पश्चिम बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने मुंबईसह उर्वरित महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. आता परतीच्या पावसाचा वेग वाढला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून उत्तर भारताचा आणखी काही भाग, मध्य आणि पश्चिम भारताच्या काही भागातून परतण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. ११ आॅक्टोबर रोजी कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी, उत्तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १२ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल; तर विदर्भात हवामान कोरडे राहील. १३ आणि १४ आॅक्टोबर रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल; तर मराठवाड्यासह विदर्भात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
परतीच्या पावसाचा मुसळधार इशारा
By admin | Published: October 11, 2016 6:37 AM