पूजा दामले,
मुंबई-डोळे लाल होणे, अचानक कमी दिसायला लागणे अशा समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती रुग्णालयात डोळे तपासणीसाठी नेहमी येतात. पण, यापैकी सरासरी पाच व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे निदान होते. म्हणजेच या व्यक्तींना मुळात डोळ्यांचा त्रास नसतो. उच्च रक्तदाबाचा दुष्परिणाम त्यांच्या डोळ््यावर झालेला असतो. पण, हे त्या व्यक्तींच्या ध्यानीमनीही नसते. उच्च रक्तदाबामुळे डोळ््यांचे विकार जडलेल्या किमान ५ रुग्णांना आम्ही रोज तपासतो, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. अनेक व्यक्ती नियमित आरोग्य तपासणी करुन घेत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब असल्याचे निदान लवकर होत नाही. उच्च रक्तदाब अथवा अतिउच्च रक्तदाब झाल्यास अनेकदा कोणतेही लक्षण पटकन समोर येत नाहीत. त्यामुळे हा आजार सायलेंट किलर म्हणूनही ओळखला जातो. उच्च रक्तदाबाचे लवकर निदान न झाल्यास कालांतराने त्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यानंतर उच्च रक्तदाब असल्याचे निदान होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जे.जे. रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागात तपासणीसाठी आलेल्या व्यक्ती डोळ््याला त्रास होत असल्याचे सांगतात. पण, त्यावेळी त्यांचा रक्तदाब तपासल्यास उच्च रक्तदाब असल्याचे दिसून येते. पण, या व्यक्तींना रुग्णालयात येईपर्यंत उच्चरक्तदाब असल्याचे माहितच नसते, असे डॉ. लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. उच्च रक्तदाबाचे दीर्घकाळ निदान झाले नाही. तर, डोळ््यांवर त्याचा परिणाम होऊन दृष्टी जाण्याचाही धोका संभवतो, असेही ते म्हणाले.