मनोज गडनीस, मुंबईदिवाळीच्या निमित्ताने जर एखाद्या व्यावसायिक मित्राने काही भेटवस्तू (गिफ्ट) पाठविली तर त्या गिफ्टची खरेदी पावती मित्राकडून घेऊन ठेवा. कारण त्या वस्तूची आणि त्याच्या मूल्याची नोंद चालू वर्षाचे प्राप्तिकर विवरण भरताना त्यात करावी लागणार आहे.प्रेमाने दिलेल्या भेटवस्तू आणि प्राप्तिकर याचा संबंध काय, असा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे, पण घटलेल्या कर संकलनाच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या प्राप्तिकर विभागाने आता कर संकलनासंदर्भातील विविध कलमांचा प्रभावीपणे वापर करण्यास सुरुवात केली आहे. याच दृष्टीने प्राप्तिकर कायदा कलम २८ आणि कलम ५६ अंतर्गत तपासणी करण्याचे संकेत विभागाने दिले आहेत. विभागातील उच्चस्तरीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम २८ अंतर्गत तुमच्या व्यावसायिक संबंधांतून मिळालेल्या भेटवस्तू या व्यावसायिक उत्पन्नाचा भाग म्हणून गणल्या जातात व त्या वस्तूच्या मूल्याच्या अनुषंगाने ती स्वीकारणाऱ्या व्यक्तीस त्या वस्तूची नोंद विवरणात करतानाच त्यावरील करभरणा करावा लागेल. तर, कलम ५६ अंतर्गत भेटवस्तूचे मूल्य नमूद करावे लागेल. --------------------आपल्याला गिफ्ट मिळाले आणि त्याची नोंद केली नाही तर विभागाला काय समजणार आहे, असा विचारही कदाचित केला जाईल. पण गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीलाही गिफ्ट खरेदीचा तपशील विवरणात नमूद करावा लागणार असून गिफ्ट वितरणाचे तपशील नमूद करून व्यावसायिक खर्चात (बिझनेस एक्सपिन्डीचर) सूट मिळवावी लागणार असल्याने, गिफ्ट स्वीकारणाऱ्या व्यक्तीला त्याची नोंद ठेवणे अपरिहार्य होणार आहे.-------------------------------------------------गेल्यावर्षी दिवाळी निमित्त भेटवस्तूंच्या बाजारात सुमारे १२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे या उलाढालीकडे आणि संभाव्य कर संकलनाकडे विभागाचे विशेष लक्ष आहे. जर एखाद्या व्यक्तीने व्यावसायिक नव्हे तर वैयक्तिक मित्र म्हणून गिफ्ट देण्याचे ठरविले तर कराची रचना वेगळी आहे. याअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतची भेटवस्तू ही करमुक्त असेल. परंतु गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला त्या गिफ्टचा खर्च वैयक्तिक खात्यातून केला असे दाखवावे लागेल.
दिवाळी गिफ्टवर प्राप्तिकर खात्याची नजर
By admin | Published: October 29, 2015 1:28 AM