महापालिकेवर डोळा! विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा ठाकरे गट काँग्रेसला सोडणार? मविआत जागावाटपाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 03:22 PM2024-07-18T15:22:19+5:302024-07-18T15:23:19+5:30
ठाकरे शिवसेनेला मुंबई, कोकण; राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे. अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे.
लोकसभेत महायुतीला दणका दिल्यानंतर आता महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. मविआतील तिन्ही पक्ष ९० ते ९५ जागा लढविण्याची शक्यता आहे. परंतू या जागा कोणत्या असतील यावर ओढाताण होण्याची शक्यता आहे. ठाकरे शिवसेनेला मुंबई, कोकण; राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे. अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे. यापैकी महत्वाचा असलेला मुंबई भाग शिवसेनाला हवा आहे.
दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबईतील बहुतांश जागा ठाकरे गट आपल्याकडे ठेवण्याची साधक बाधक चर्चा झाल्याचे समजते आहे. विधानसभेच्या ज्या जागांवर जो पक्ष मजबूत असेल त्याला ती जागा सोडण्यात यावी, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेस यात नसल्याने व मुंबईत एकतर ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांचेच वर्चस्व असल्याने आता ठाकरे मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी काँग्रेसला किती जागा सोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गट मुंबईतील ३६ पैकी २५ ते २८ जागा लढविण्याची तयारी करत असल्याचे समजते आहे. भाजपसोबत मैत्री असताना ठाकरे शिवसेनेने गेल्यावेळी १४ जागा जिंकल्या होत्या. यापैकी आठ आमदार आता ठाकरेंसोबत तर सहा आमदार शिंदेंसोबत आहेत. यापैकी एक आमदार आता खासदार झाले आहेत. यामुळे दोन्ही गटाकडून या जागांवर नव्या उमेदवारांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२०१९ मध्ये काँग्रेसचे चार आमदार आले होते. त्यापैकी वर्षा गायकवाड आता खासदार आहेत. तर राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून आला होता. हा आमदार आता महायुतीसोबत आहे. यामुळे इथेही काही प्रमाणात तडजोड होण्याची शक्यता आहे. लोकसभेचे यश पाहता ठाकरे गट महापालिका निवडणुकीची बालेकिल्ल्यातील तयारी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीशी उर्वरित राज्यातील जागांवर तडजोड करून मुंबईत जादाच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.