राजू इनामदार पुणे: राज्यातील काँग्रेस पक्षात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या ‘ पडझडी’ची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असल्याचे समजते. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे दोन वरिष्ठ निरीक्षक येत्या दोन दिवसांत मुंबईत दाखल होणार असून ते गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या मध्यंतरीच्या काही धक्कादायक पक्षांतराच्या घटनांची चौकशी करणार आहेत. पक्षाला क्षीण करणाऱ्या या गोष्टींबाबत राज्य संघटनेतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील, बॅरिस्टर अंतूले यांचे पूत्र नावीद यांनी जाहीरपणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दुसºया पक्षात प्रवेश केला आहे. त्याशिवाय पुण्यासारख्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्याबाबत सातत्याने घोळ घालण्यात येत आहे. गाडगीळ घराण्यातील आमदार अनंत गाडगीळ जाहीरपणे नाराजी व्यक्त करतात. या सगळ्याच गोष्टींचा अर्थ काँग्रेस नेतृत्त्वाने महाराष्ट्रात पक्षामध्ये काही गडबड सुरू आहे असा लावला आहे. राज्याचे प्रभारी असलेले मल्लिकार्जून खर्गे तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने नियुक्त केलेल्या सोनल पटेल यांच्याकडे पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी याबाबत विचारणा केली असल्याची माहिती मिळाली.ही सगळीच घराणी काँग्रेसबरोबर कायम एकनिष्ठ राहिली आहेत. पक्ष अडचणीत असतानाही त्यांनी पक्षालाच साथ दिली. असे असताना आता त्यांचे वारस पक्ष का सोडत आहेत असा प्रश्न राहूल गांधी यांनी विचारला. राज्यातील पक्षाचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केला, तरीही राधाकृष्ण विखे पदावर अजून कायम आहेत. ते मतदार संघात मुलासाठी म्हणून काँग्रेस तसेच भाजपाच्या नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेत आहेत, याचा अर्थ काय काढायचा अशी विचारणा राहूल यांनी करून प्रदेश शाखेच्या एकूणच कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली अशी माहिती पक्षातील सुत्रांनी दिली.याआधीही राहूल यांनी प्रदेश शाखेने शिफारस केलेल्या राज्यातील उमेदवार यादीतील काही नावांबाबत हरकत घेत, ही नावे स्थानिक पदाधिकाºयांबरोबर चर्चा करून निश्चित केलेली नाही असे स्पष्ट मत खर्गे यांच्याकडे व्यक्त केले होते. प्रदेशाध्यक्षांकडे विचारणा करा व नवी यादी पाठवण्यास सांगा असेही त्यांनी खर्गे यांना सुचवले होते. याही वेळी त्यांनी खर्गे यांच्याकडे राज्याचे प्रभारी पद तुमच्याकडे असताना तिथे पक्षातून असे आऊटगोईंग सतत का सुरू आहे असे विचारले. त्यानंतरच अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने दोन निरीक्षक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एकदोन दिवसात हे निरीक्षक मुंबईत दाखल होती असे समजते. दरम्यान महासमिताने पक्षाचे राज्यातील निवडणूक निरिक्षक म्हणून मधूसुदन मिस्त्री यांची नियुक्ती केली आहे. त्यांनाही पक्षांतर प्रकरणाची माहिती घेण्याबाबत महासमिताने आदेश दिले असल्याचे समजते. लवकरच ते मुंबईत दाखल होणार असून राज्याचा दौरा करणार आहेत.
काँग्रेस पक्षातील ‘पडझडी’ ची केंद्राकडून गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 4:54 PM