शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच कायमस्वरूपी ब्रॅण्ड
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच आमचा कायमस्वरूपी ब्रॅण्ड आहे. उद्धवजी हा ब्रॅण्ड घेऊन राजकीय वाटचाल करत आहेत आणि यापुढेही करतील. या प्रवासात उद्धवजी आणि आदित्य ठाकरे ही दोन बाजू असलेले चलनी नाणे शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने प्रहार ते प्रशासन असा धगधगता प्रवास केला आहे. सत्ता हे साध्य आहे, साधन नाही याची जाणीव बाळासाहेब शिवसैनिकांना नेहमीच करून देत. आता कुणी प्रलोभनाने, कुणी कारवाईच्या भयाने शिवसेनेपासून दूर झाले असतील. शिवसेनेच्या निखाऱ्यांवर अधूनमधून राख जमते; पण ती तितक्याच तत्परतेने झटकलीही जाते. हेच या निखाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. शिवसेनेने दिलदारपणे भाजपला हात दिला; पण भाजपने सुरुवातीपासूनच शत प्रतिशतचा नारा देत आपण कृतघ्न असल्याचेच दाखवून दिले. बाळासाहेबांच्या दिलदारपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला. उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडताना उभा महाराष्ट्र हळहळला. अडीच वर्षात कोरोनासारखं संकट असताना त्यांनी अद्भुत कामगिरी करत सर्वोत्तम मुख्यमंत्री असा सन्मान मिळवला. शिवसेनेची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल ही निश्चितच यशाकडे झेप घेणारी असेल. त्यामुळे यापुढेही उद्धव ठाकरे हेच नाव चालेल, यात शंकाच नाही. - अरविंद सावंत, खासदार, शिवसेना
राज ठाकरे हाच पुढच्या काळातील ब्रँड असेल
राजकारणात कोणतीही परिस्थिती असो, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कायमच आपल्या विचारात सातत्य ठेवले आहे. मराठी, हिंदुत्वाचे मुद्दे त्यांनी कधीच सोडले नाहीत. जनता आज स्थिर विचारांच्या राजकारण्याच्या शोधात आहे. गेल्या अडीच वर्षांचा शिवसेनेचा कार्यकाळ पाहिला तर तो निराशाजनकच आहे. गुढीपाडव्याचा मेळावा असो की संभाजीनगरची सभा; राज ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्याचं कारण हेच आहे. राजकारणातील चंचलपणाला कंटाळलेली जनता विश्वासार्ह नेत्याच्या प्रतीक्षेत आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक खंबीर नेते होते. त्यानंतर आतापर्यंतचे शिवसेनेचे राजकारण त्यांच्या पुण्याईवर चालले; पण आता मात्र शिवसेना नेते उघडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने आतापर्यंतची वाटचाल आत्मविश्वासपूर्वक केली आहे. बाळासाहेबांनंतर त्यांच्यासारखा नेता कोण, असा सवाल केला तर एकच उत्तर मिळते, राज ठाकरेच! मनसेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीत पक्षाच्या वाट्याला यश आले, तसेच अपयशही आले; पण अपयश पचवून वाटचाल सुरूच आहे. मोदी लाटेची तर सर्वच पक्षांना झळ बसली; पण कोणत्याही परिस्थितीत मनसेने आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. जनता या सगळ्यांचे अवलोकन करीत आहेच. त्यामुळे राज ठाकरे हाच पुढच्या काळातील ब्रँड असेल. - संदीप देशपांडे, मनसे नेते