ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 - अभिनेत्रीने फेसबुकवर ‘ब्लॉक’ केल्याच्या रागामधून बनावट खाते उघडून तिची छायाचित्रे ओएलएक्स व कॉलगर्लच्या यादीमध्ये टाकण्याची धमकी देत तिच्याकडे खंडणी मागणा-याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खंडणीसाठी धमकावणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिली. पिडीत अभिनेत्रीने काही मराठी मालिका तसेच सिनेमांमधून काम केलेले आहे.
नावेद लतिफ शेख (30, ईगतपुरी, नाशिक) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 23 वर्षीय तरूणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीचे फेसबुकवर अकाऊंट आहे. गाडीवर चालक म्हणून काम करणा-या नावेदने अभिनेत्रीला 19 आॅक्टोबर रोजी ‘सुफियान अन्सारी’ या नावाने फ्रेन्डरिक्वेस्ट पाठवली. ही रिक्वेस्ट अभिनेत्रीने अॅक्सेप्ट केली. या अकाऊंटबद्दल शंका आल्याने ती नंतर ब्लॉकही करुन टाकली.
आरोपीने 20 आॅक्टोबर रोजी तिच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले. त्यावर तिच्या आईची छायाचित्रे टाकून अश्लिल शेरेबाजी केली. तसेच ‘सुफियान अन्सारी’’ हे अकाऊंट का ब्लॉक केले अशी विचारणा करीत तिच्या नातेवाईकांचे फोटो ओएलएक्स व कॉलगर्लच्या यादीमध्ये टाकण्याची धमकी दिली. तिच्याकडे जबरदस्तीने मोबाईल क्रमांक मागितला. तसेच इंटरनेटचे रिचार्ज करण्यास सांगून पाच हजारांच्या खंडणीची मागणी केली. पैसे मिळाल्यावरच बनावट अकाऊंट बंद करीन असेही त्याने सांगितले होते. घाबरलेल्या अभिनेत्रीच्या भावाने त्याचे इंटरनेट रिचार्ज करुन दिले. त्यानंतरही त्याने 22 आॅक्टोबर रोजी अभिनेत्रीच्या काकुसह तिचीही छायाचित्रे फेसबुकवर टाकूल त्यावर अश्लिल शेरेबाजी केली. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला नाशिकवरुन अटक करुन न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.